संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : रोज रात्री चालणाऱ्या दारूच्या पार्ट्या, बेवड्यांचा धिंगाणा व शिवराळ भाषेतील गदारोळ. उड्डाणपुलाखालील जागेतील अतिक्रमण, उड्डाणपुलाखाली सकाळपासून रात्री उशिरापर्यत फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे स्थानिक भागातील रहीवाशी त्रस्त झाले असून पोलिसांनी व महापालिका प्रशासनाने वेळीच कारवाई न केल्यास स्थानिक रहीवाशांचा उद्रेक होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
राजीव गांधी उड्डाणपुला हा नेरूळ पूर्वेला आणि पश्चिमेला जोडण्याचे काम करत आहे. नेरूळ पश्चिमेकडील बाजूस असलेला नेरूळ सेक्टर ८ व सेक्टर २ मधील भागात असलेल्या उड्डाणपुलाखालील भाग गेल्या काही महिन्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ठराविक राजकीय घटकांनी त्या भागात केलेले अतिक्रमण, तेथे रात्री-अपरात्री चालणाऱ्या दारूच्या पार्ट्या आणि शिवराळ भाषेत चालणारा गदारोळ यामुळे त्यासभोवताली असणाऱ्या सिडको सदनिकाधारकांच्या झोपा उडाल्या आहेत. त्या ठिकाणी अतिक्रमण करून बकरी पालन चालत असतानाही या अतिक्रमणाचा महापालिका प्रशासनाकडून व पुलाखाली रात्री-अपरात्री चालणाऱ्या दारूच्या पार्ट्या याचा नेरूळ पोलिसांकडून अद्यापि बंदोबस्त होत नसल्याने स्थानिक रहीवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. महापालिका प्रशासनाने राजीव गांधी उड्डाणपुलाखाली असलेले अतिक्रमण कायमस्वरूपी हटवावे आणि पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवून दारूच्या पार्ट्या व शिवराळ भाषेत चालणारा गदारोळ यावर कारवाई करून संबंधितांना जेलवारी घडविण्याची मागणी स्थानिक रहीवाशांकडून करण्यात येत आहे.
या उ्डाणपुलाखाली व सभोवताली फेरीविक्रेत्यांचे अतिक्रमण वाढले असून परिसराला बकालापणा प्राप्त झाला आहे. या फेरीवाल्यांमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होवू लागला आहे. एका प्रस्थापित राजकीय घटकाच्या जवळचा कार्यकर्ता या फेरीवाल्यांकडून मिठाई घेवून त्यांना आश्रय देत असल्याचा आरोपही स्थानिक रहीवाशांकडून करण्यात येत आहे. पुलाखालील अतिक्रमण, फेरीवाल्यांचा बंदोबस्त यावर महापालिका प्रशासनाने तसेच दारूच्या पार्ट्या व रात्री उशिरापर्यत चालणाऱ्या गोंधळाचा पोलिसांनी कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक रहीवाशांकडून करण्यात येत आहे.