नवी मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील मांडवी जेटी परिसर व समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबविण्याची मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची भाषा करत आजवर असंख्य राजकारण्यांनी कोकण भागाची व कोकणवासियांची केवळ दिशाभूलच करण्याचे काम केले आहे. परंतु प्रशासनाच्या स्वच्छतेबाबतच्या उदासिनतेमुळे कोकणच्या निसर्ग सौंदर्यालाही ग्रहण लागून भुतलावरील स्वर्गाला बकालपणाचा विळखा पडू लागला असून पर्यटकही आता काढता पाय घेवू लागले आहेत. ही कोकणवासियांची आज खऱ्या अर्थाने शोकांतिका असल्याची नाराजी हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.
मांडवी जेटी व समुद्रकिनाऱ्यावर आपण तात्काळ पाहणी केल्यास आज तेथील भयावह परिस्थितीची आपणास कल्पना येईल. ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या मांडवी समुद्रकिनाऱ्यावर मात्र गटाराचे पाणी वाहत असल्यामुळे या परिसरात पर्यटक फिरण्यास येत नाही. अस्वच्छता पाहून काही पर्यटक चक्क वाईट शब्दांत बोलतात आणि निघून जातात, अशा गलिच्छ वातावरणामुळे पर्यटन वाढणार कसे? हा प्रश्न आहे. मांडवी जेट्टी परिसर, समुद्रकिनारा पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. त्यामुळे लाखो पर्यटक या किनाऱ्यावर येऊन जातात. गणेश विसर्जन असो वा दसऱ्याला देवींचे विसर्जन असो येथे गर्दी पाहायला मिळणारच. या किनाऱ्यावर विविध व्यवसाय करून अनेक लोक आपली उपजीविका करतात. यामध्ये भेळ, स्नॅक्स सेंटरचालक, लहान मुलांची खेळणी चालक, घोडेस्वार, उंट सफारी, फुगेवाले आणि अनेक प्रकारची खेळणी विक्रेता तसेच भुईमुगाच्या शेंगा विक्रेते असे अनेक जणांचा समावेश आहे. परंतु किनाऱ्यावरील अस्वच्छतेमुळे त्यांच्या विक्रीवरही परिणाम होत आहे. गटारातून येणारे सांडपाणी थेट किनाऱ्यावर येत असल्यामुळे पर्यटक फक्त किनाऱ्याचे दर्शन घेऊनच परत जात आहेत. पर्यटक आल्या पावली परतजागतिक पर्यटन दिनानिमित्त २७ सप्टेंबरला रत्नागिरी पर्यटन सेवा सहकारी संस्थेतर्फे पर्यटन महोत्सव साजरा झाला. यात जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी झाले. पर्यटन वाढण्यासाठी काय केले पाहिजे, यावर त्यात मंथन करण्यात आले. परंतु, रत्नागिरी शहरातील मांडवी पर्यटनस्थळाची परिस्थिती पाहिल्यानंतर पर्यटक आल्या पावली परत जात असल्याने सुधारणेची गरज आहे. या सागर किनाऱ्याची व जेट्टीची स्वच्छता न झाल्यास या पाण्यालाही गटार व नाल्याचे मोठे स्वरूप प्राप्त होईल. पर्यटक तर सोडा, स्थानिक कोकणवासियही इकडे फिरकणार नाही. आपण तात्काळ तेथील स्थानिक प्रशासनाला गटाराची सफाई किंवा पाईपलाईन दुरुस्ती करण्याचे निर्देश द्यावेत, मांडवी जेट्टीला व समुद्रकिनाऱ्याला बकालपणा आणण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.