स्वाती इंगवले : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महिला या मूलत:च समर्थ व सहनशील असून त्यांच्यामधील निर्मिती क्षमतेला व ऊर्जेला योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना, उपक्रमांच्या माध्मयातून नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच आघाडीवर राहिली असल्याचे सांगत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी महिलांनी बनविलेल्या विविध वस्तूंना विक्रीकरिता व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रदर्शन आयोजित केले जात असल्याचे सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिका बेलापूर विभाग कार्यालयाच्या वतीने सीबीडी बेलापूर येथील वारकरी भवन मध्ये नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून आयोजित महिला स्नेहसंमेलन व महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री उपक्रम शुभारंभ प्रसंगी त्या आपले मनोगत व्यक्त करीत होत्या.
याप्रसंगी सनराईज कँडल्स अँड ओशोनी व्हिजन फॉर द ब्लाईंड वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भावेश भाटिया, उपक्रमाच्या आयोजक बेलापूर विभागाच्या सहा. आयुक्त डॉ. मिताली संचेती, नागरी आरोग्य केंद्र सीबीडी बेलापूरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शना वाघमारे तसेच माजी नगरसेवक, नगरसेविका आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना हजारो दिव्यांगाना मेणबत्ती निर्मिती उद्योगाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे व्याख्याते डॉ. भावेश भाटिया यांनी शेरोशायरीची पखरण करीत आपले व्यवसायविषयक अनुभव कथन केले व उपस्थितांचा उत्साह वाढविला. कोणताही व्यवसाय करताना मार्केटिंग महत्वाचे असल्याचे सांगत ग्राहकांशी सौजन्यपूर्ण संवाद, वस्तू विक्रीचे कौशल्य याविषयी त्यांनी अनेक महत्वाच्या टिप्स महिलांना दिल्या.
दि. ८ व ९ ऑक्टोबर अशा या दोन दिवसीय प्रदर्शनामध्ये महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तुंचे २३ स्टॉल्स असून त्यामध्ये रूचकर खाद्यपदार्थांचे स्टॉल, आईस्क्रीम स्टॉल, दिव्यांगांनी निर्माण केलेल्या मेणबत्ती व इतर वस्तुंचा स्टॉल तसेच महिला व मुलांचे कपडे, पिशव्या, पर्सेस, खेळणी व इतर आकर्षक वस्तुंचे स्टॉल्स आहेत. यातील 4 स्टॉल्स महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तुंचे असून इतर स्टॉल्स वैयक्तिक महिलांचे आहेत.
यावेळी उपक्रमाच्या आयोजक बेलापूर विभागाच्या सहा. आयुक्त डॉ. मिताली संचेती यांनी या प्रदर्शनामागील भूमिका विषद करताना कोरोना प्रभावित काळात रोजगार व्यवसायाला आलेली शिथिलता कमी करून महिला बचत गट तसेच दिव्यांगांना एक स्वयंरोजगारासाठी एक खुले व्यासपीठ मिळावे हा प्रयत्न असल्याचे सांगत अल्प कालावधीत उपक्रमाचे आयोजन करूनही या उपक्रमाला लाभलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी सीबीडी बेलापूर नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचाही लाभ महिलांनी मोठ्या प्रमाणावर घेतला.