स्वाती इंगवले : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रभाग ४२ फेरीवाला मुक्त करण्यासाठी कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासनाने सातत्याने कारवाई करण्याची लेखी मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
कोपरखैराणे नोडमधील महापालिका प्रभाग ४२ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १६,१७,२२,२३ या परिसराचा समावेश होत आहे. एकेकाळी हा प्रभाग फेरीवालामुक्त प्रभाग म्हणून नवी मुंबई शहरात ओळखला जायचा. वै. देविदास हांडेपाटील यांच्या हयातीत या प्रभागात फेरीवाल्यांचा कधीही शिरकाव झालेला नाही. प्रभाग स्वच्छ असावा, प्रभागात कोठेही बकालपणा नसावा यासाठी देविदास हांडेपाटीलसाहेबांनी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सदोदित प्रयत्न केले आहेत. मे २०२० मध्ये हांडेपाटील साहेबांचे निधन झाले. या कालावधीत पुन्हा फेरीवाला समस्येने डोके वर काढले आहेत. स्थानिक रहीवाशी सातत्याने आमच्याकडे फेरीवाल्यांना हटविण्याची मागणी घेवून येत असतात. आज प्रभागात फेरीवाल्यांचा उद्रेक झाला असून पदपथावरही ते अतिक्रमण करू लागले आहेत. परिसराला प्रथमच बकालपणा येवू लागला आहे. स्थानिक रहीवाशी उघडपणे पालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त करू लागले आहेत. प्रभाग ४२ मध्ये महापालिका प्रशासनाने सातत्याने अतिक्रमण विभागाची मोहीम राबवून हा परिसर फेरीवाला मुक्त करून स्थानिक रहीवाशांच्या मागणीला न्याय द्यावा, अशी मागणी सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
सुनिता देविदास हांडेपाटील यांनी यापूर्वीही महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना ४ ऑक्टोबर २०२१ रोजी निवेदनातून समस्येचे गांभीर्य व स्थानिक रहीवाशांची नाराजी निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. आयुक्तांनी ते निवेदन तात्काळ
Additional Commissioner Services Commissioner Services <amcservices@nmmconline.com>,
Amrish Patnigere apatnigere@nmmconline.com या संबंधितांना फॉरवर्डही केले आहे. परंतु कारवाई कधी होणार व आमचा प्रभाग फेरीवाल्यांच्या विळख्यातून कधी मुक्त होणार याची विचारणा होवू लागली आहे. निवेदन फॉरवर्ड करून झाल्यावर संबंधितांनी काय कारवाई केली आहे, समस्येचे निवारण झाले आहे काय अथवा फॉरवर्ड केलेल्या निवेदनाकडे कानाडोळा केला आहे याचीही माहिती जाणून घ्यावी अशीही विनंती सुनिता हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना केली आहे.