संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोव्हीड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यापासून बंद असलेल्या नाट्यगृहांतील तिसरी घंटा महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ११ ऑक्टोबर २०२१ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार २२ ऑक्टोबर पासून पुन्हा वाजणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह देखील नाट्यप्रयोग व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नव्याने सज्ज झाले असून रंगमंच व प्रेक्षागृह याची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून घेण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.
कोव्हीडची पहिला लाट ओसरल्यानंतर जानेवारी महिन्यापासून नाट्यगृहामध्ये ५० टक्के उपस्थितीमध्ये प्रयोगांना सुरुवात झाली होती. तथापि कोव्हीडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर एप्रिल महिन्यापासून प्रयोग बंद करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ब्रेक द चेन – अद्ययावत सूचना यानुसार मार्गदर्शक तत्वांच्या आधिन राहून २२ ऑक्टोबरपासून नियंत्रित स्वरुपात नाट्यगृहे सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली असून नवी मुंबई महानगरपालिकेने २२ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम, संगीताचे कार्यक्रम, इतर करमणुकीचे कार्यक्रम, परिषद, संमेलने आयोजित करण्यासाठी विविध संस्था / व्यक्ती यांचे अर्ज मागविण्याकरिता जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यानुसार आता विष्णुदास भावे नाट्यगृह एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत कोव्हीड नियमावलीचे पालन करून रसिकांच्या उत्साही प्रतिसादात सुरु होणार आहे.