बाजार समिती प्रतिनिधी : संतोष शिंदे : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती स्टॉल सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील पाचही मार्केटमध्ये विविध प्रकारचे स्टॉल असून स्टॉलधारकांना व्यवसाय करताना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. स्टॉल धारक मालकांची शिवसेना प्रणित युनियनच्या माध्यमातून बाजार समिती आवारातील पाचही मार्केटमधील स्टॉलधारकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बाजार समिती प्रशासनाकडे पाठपुरावा केला जातो.
तीन महिन्यापूर्वी युनियनच्या पदाधिकारी व स्टॉल मालक यांनी पत्राद्वारे नाहटा यांना स्टॉल मालक सेनेचे अध्यक्षपद स्विकारून स्टॉलधारकांचे नेतृत्व करण्याची गळ घातली होती. त्यानुसार २६ ऑक्टोबर रोजी स्टॉल मालक सेनेचे पदाधिकारी आणि स्टॉल मालक यांनी विजय नाहटा यांची भेट घेऊन नाहटांना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती स्टॉल मालक सेनेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली.
यावेळी स्टॉल मालक सेनेचे पदाधिकारी शिवाजी मोरे, नितीन पिसे, फडतरे यांनी विजय नाहटा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आजवर आम्हाला व्यवसाय करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. पण आजपासून अभ्यासू ,सुशिक्षित आणि तितकेच आक्रमक नेतृत्व आम्हाला लाभले असल्याचा आम्हा सर्व स्टॉल मालक सेनेच्या सदस्यांना आनंद होत असल्याचे नितीन पिसे यांनी यावेळी सांगितले. यापुढे विजय नाहटा यांच्या मार्गदर्शनानुसारच स्टॉल मालक सेनेची वाटचाल राहील असे उद्गार शिवाजी मोरे यांनी काढले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मिलिंद सूर्यराव, शहरप्रमुख विजय माने, उत्तर भारतीय सेलचे प्रमुख कमलेश वर्मा, उपशहरप्रमुख प्रदीप वाघमारे, युवा सेनेचे सरचिटणीस प्रवीण कांबळे आणि स्टॉल मालक बहुसंख्येने उपस्थित होते.