महापालिका प्रतिनिधी : मनिष चव्हाण : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वृक्षांच्या अनावश्यक वाढलेल्या तसेच वाहतुकीस व विद्युत दिव्यांस अडथळा ठरणाऱ्या किंवा धोकादायक स्थितीत असलेल्या वृक्षांच्या फादयांची छाटणी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या उदयान विभागाकडे सद्य:स्थितीत ३ वाहने उपलब्ध आहेत. तथापि संपूर्ण महापालिका क्षेत्रासाठी या वाहन संख्येमध्ये वाढ करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यानुसार या वाहनांची गरज लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मान्यतेने वाहन विभागामार्फत उद्यान विभागाकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित २३ मीटर उंचीपर्यंतच्या वृक्ष छाटणीचे काम करण्यासाठी उपयुक्त अशी चार नवीन अद्ययावत एरियल लॅडर प्लॅटफॉर्म वाहने उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
उदयान विभागाकडे वृक्ष छाटणी करण्यासाठी ३ वाहने उपलब्ध आहेत. या वाहनांमार्फत १३ मीटरपर्यंत उंच वृक्षांची छाटणी करणे शक्य होत आहे. तथापि त्यापेक्षा अधिक उंचीच्या वृक्ष छाटणीमध्ये अडचण भासत होती. त्या अनुषंगाने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन ४ वाहने २३ मीटर उंचीपर्यंतच्या वृक्ष छाटणीसाठी उपयोगी ठरणार असल्याने उंच झाडांच्या धोकादायक फांदयांची छाटणी नियमीतपणे करणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे या नवीन ४ वाहनांची बांधणी वाहन विभागाने २८२० मिमी व्हील बेसच्या छोटया चेसिसवर करण्याची काळजी घेतलेली असल्याने सदर वाहनांमार्फत अरुंद रस्त्यालगतच्या वृक्षांची छाटणी करणे सुध्दा सोयीचे होणार आहे. या अत्याधुनिक वाहनांमुळे उद्यान विभागाचे सक्षमीकरण झालेले आहे.