महापालिका प्रतिनिधी : मनिष चव्हाण : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
सानपाडा सेक्टर ८ मधील विद्युत उपकेंद्रात सफाई अभियान राबवा : पांडुरंग आमले
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ८ मधील सेव्हन्थ डे शाळेच्या मागील बाजूस असलेल्या विद्युत उपकेंद्रात स्वच्छता अभियान राबवून तेथील बकालपणा घालविण्याची लेखी मागणी सानपाडा नोडमधील भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे एका निवेदनातून केली आहे.
सानपाडा सेक्टर ८ मधील सेव्हन्थ डे शाळेच्या पाठीमागील बाजूस महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (एमएसईडीसी) विद्युत उपकेंद्र (सबस्टेशन) आहे. या ठिकाणी पाहणी अभियान राबविल्यास आपणास तेथील समस्यांची कल्पना येईल आणि त्या अभियानात आम्हाला सहभागी करून घेतल्यास तुम्हाला त्या समस्यांचे गांभीर्य, परिसराला आलेला बकालपणा आणि स्थानिकांना जाणवणारा त्रास आपल्या निदर्शनास आणून देता येईल. विद्युत उपकेंद्राला पूर्णपणे बकालपणा आला असून सर्वच कानाकोपऱ्यात कचरा पडलेला असून तेथे सफाई होणे आवश्यक आहे. विद्युत उपकेंद्राचे प्रवेशद्वाराची डागडूजी होवून ते प्रवेशद्वार बंद असणे आवश्यक आहे. जेणेकरून महावितरणचे कर्मचारी वगळता अन्य कोनाचीही त्या ठिकाणी ये-जा होता कामा नये. मुख्य प्रवेशद्वाराची डागडूजी होईपर्यत आतील लोखंडी प्रवेशद्वाराला कुलुप लावून ते बंद करावे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी ये-जा करणारे लघुशंका करत असल्याने सभोवताली रात्रीच्या वेळी दुर्गंधी सहन करावी लागत असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत. हे एमएसईडीसीचे उपकेंद्र आहे, लघुशंका करण्याचे ठिकाण नाही. हे उपकेंद्र उघडे असल्याने गर्दुले या ठिकाणी येण्याची व कोणतीही दुर्घटना होण्याची भीती आहे. सर्वप्रथम विद्युत उपकेंद्राची डागडूजी करून प्रवेशद्वार बंदीस्त करावे. विद्युत उपकेंद्राच्या आवारातील सर्व कचरा हटविण्यासाठी सफाई अभियान राबवून त्या ठिकाणी स्वच्छता निर्माण करावी, जेणेकरून तेथील बकालपणा संपुष्ठात येईल. विद्युत उपकेंद्र सताड उघडे असल्याने दुर्घटना होण्याची भीती आहे. लवकरात लवकर सफाई अभियान राबवावे तसेच उपकेंद्राची डागडूजी करून बंदीस्त करण्याची मागणी भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी केली आहे.