संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : संपूर्ण देशात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढल्याने २५ मार्च २०२० पासून संपूर्ण देशात टाळेबंदी लागू करण्यात आलेली होती. नागरिकांना प्रवासी सेवा देणारा नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम अत्यावश्यक सेवेत येत असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी परिवहन उपक्रमाचे बस संचलन आवश्यक त्या प्रमाणात सुरू ठेवण्यात आले होते.
सद्यस्थितीत सर्वसामान्य प्रवाशी जनतेसाठी सार्वजनिक बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत शासनाकडून सूचित करण्यात आले असल्याने नमुंमपा परिवहन उपक्रमामार्फत टप्प्याटप्प्याने कार्यरत बसेसमध्ये वाढ करून संपूर्ण बस मार्गावरील बससंचलन पूर्ववत करण्यात येत आहे.
एनएमएमटी उपक्रमाचा मार्ग क्र. ५८ हा वाशी सेक्टर ७ ते खोपोली असा कार्यान्वित आहे. सद्यस्थितीत या मार्गावर सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी २ बसेसव्दारे प्रवाशी सेवा देण्यात येत होती. तथापि कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असल्याचे लक्षात घेता प्रवाशी जनतेच्या सततच्या मागणीनुसार या मार्गावर अंशत: बदल करून बसेस वाढविण्यात येत आहेत.
या बदलामध्ये एनएमएमटी मार्ग क्रमांक ५८ हा बस मार्ग वाशी सेक्टर ७ ऐवजी बेलापूर रेल्वे स्थानकापर्यंत सिमित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बसेसमध्ये वाढ करून संपूर्ण दिवसाचे ७ -५ – ७ बसेस द्वारे प्रवाशी सेवा देण्यात येत आहे. याशिवाय दोन बस फेऱ्यांमधील कालावधी कमी करून आता ५८ क्रमांकाच्या मार्गावर ३० ते ३५ मिनिटांच्या प्रस्थांनातराने प्रवाशांना बस सेवा पुरविण्यात येत आहे.