सौ. सुवर्णा खांडगेपाटील : संपादक
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : कोव्हीड कालावधीमध्ये कोव्हीडमुळे दोन पालक अथवा एक पालक दिवंगत झालेल्या मुलांच्या संगोपनाकरीता अर्थसहाय्य देणेबाबतची कल्याणकारी योजना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असून त्यामधील पात्र ५५ लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण नवी मुंबई न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश तृप्ती देशमुख – नाईक आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. वाशी तालुका विधी सेवा समिती आणि नवी मुंबई वकिल बार असोशिएशनमार्फत डॉ.डी.वाय.पाटील विधी महाविदयालयात आयोजित कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमामध्ये बालदिनाचे औचित्य साधून बालकांसाठी असलेल्या या कल्याणकारी योजनेचे वितरण करण्यात आले.
यावेळी नवी मुंबई न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश तृप्ती देशमुख – नाईक, महापालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, समाज विकास विभागाच्या उपआयुक्त संध्या अंबादे, डी.वाय.पाटील विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अजय पाटील, महापालिकेचे विधी अधिकारी अभय जाधव, नवी मुंबई बार असोसिएशनचे कार्यकारी सदस्य ॲड. अक्षय अशोक काशिद व असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.
कोरोना कालावधीत ज्या बालकांनी आपले एक अथवा दोन्ही पालक गमावलेले आहेत त्यांच्या संगोपनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची ही योजना अत्यंत चांगली असून आज या योजनेचे वितरण करताना अतिशय समाधान लाभत असल्याचे मत याप्रसंगी बोलताना नवी मुंबई न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश तृप्ती देशमुख– नाईक यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिकेने या योजनांच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला असून त्या मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी हे अर्थसहाय्य अतिशय मोलाचे ठरेल असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी सांगितले. प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी कोरोना काळात निराधार झालेल्या मुलांसाठी व महिलांसाठी महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
कोव्हिडविषयक या योजनांची माहिती देऊन उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी निसर्ग व पर्यावरण संवर्धानासाठी माझी वसुंधरा अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना वाशी तालुका विधी सेवा समिती व नवी मुंबई वकिल बार असोशिएशन मार्फत या कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या योजनांचे अर्थसहाय्य वितरण करण्यात आले.