संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ख्रिसमस व आगामी नववर्ष साजरे करताना नागरिकांनी कोव्हीड बाधितांची दैनंदिन वाढती संख्या आणि ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन हे सण, उत्सव साधेपणाने साजरे करावेत असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले असून कोरोना प्रतिबंधक नियमांचे नागरिकांकडून काटेकोर पालन केले जात असल्याबाबत अत्यंत सतर्क राहण्याचे निर्देश महानगरपालिकेच्या विशेष दक्षता पथकांना देण्यात आले आहेत.
या अनुषंगाने विभाग कार्यालय स्तरावरील दक्षता पथकांनी तसेच मुख्यालय स्तरावरील विशेष दक्षता पथकांनी विविध समारंभ स्थळे, सार्वजनिक जागा, आस्थापना येथे अचानक भेटी देत कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिक / आस्थापना यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून १ लाख ४५ हजार ५०० रूपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली असून सुरक्षित अंतर नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिक / आस्थापनांकडून २० हजार ६०० इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे. याशिवाय कोव्हीड नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांकडून १ लाख १५ हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. अशाप्रकारे शनिवारी ख्रिसमस व त्यानंतरचा रविवार अशा २ दिवसात २ लाख ८१ हजार १०० रूपये इतका दंड महानगरपालिकेच्या दक्षता पथकांनी वसूल केला आहे.
यामध्ये वाशी विभागात सेक्टर ३० ए येथील इनॉर्बिट येथील केएफसी सफायर फुड येथे ५० टक्के क्षमतेपेक्षा जास्त उपस्थिती असल्याने ५० हजार रूपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच हार्ड केसल (मॅक़डोनल्ड) यांच्याकडून १५ हजार रूपये इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे.
त्याचप्रमाणे मराठी साहित्य संस्कृती मंडळ सेक्टर ६ (५०००/-रूपये), ब्लु इम्पिरियल बेंक्वेट हॉल (दहा हजार रूपये), साई पॅरेडाईज बेक्वेंट हॉल (१५ हजार रूपये), आएशा सलून (दोन हजार रूपये), एनएमएसए बेक्वेट हॉल (दोन हजार ५०० रूपये फक्त), बंगाली असोसिएशन हॉल (एक हजार ५०० रूपये), तुंगा बेक्वेट हॉल (सहा हजार रूपये), मर्चंट जिमखाना बेक्वेट हॉल (अडीच हजार रूपये) अशा विविध समारंभ, शुभविवाह स्थळे याठिकाणीही काटेकोर लक्ष ठेवून मास्क न वापरल्याबाबत दंडात्मक वसूली करण्यात आलेली आहे.
बेलापूर विभागामध्ये सेक्टर ४२ येथील अपना बाजार, चारभुजा स्विट्स, तिरुपती डोसा या आस्थापनांकडून प्रत्येकी दहा हजार रूपये असा एकूण तीस हजार रूपये इतका दंड वसूल करण्यात आला.
ऐरोली विभागामध्ये सेक्टर १५ येथील हेगडे भवन सभागृहात कोव्हीड नियमांचे उल्लंघन झाल्यापोटी दहा हजार रूपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. तुर्भे विभागामध्येही मॅफको मार्केट येथील नरेंद्र वाईन्स या आस्थापनेकडून दहा हजार रूपये इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे.
अशाच प्रकारे मुख्यालय स्तरावरील विशेष पथकांनी सेक्टर १४ कोपरखैरणे येथील पंजाब चायनीज तसेच सेक्टर १४ बेलापूर येथील राधा कृष्ण डेअरी या आस्थापना रात्री १२ नंतरही सुरु असल्याचे आढळल्याने कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावली अंतर्गत प्रत्येकी दहा हजार रूपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे.
ओमायकॉन व्हेरियंटचा वाढता धोका लक्षात घेता लसीकरण झाले असले तरी कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क हीच सर्वात प्रभावी बचावात्मक ढाल असल्याचे लक्षात घेऊन प्रत्येकाने मास्कचा अनिवार्यपणे वापर करावा तसेच सुरक्षित अंतर व स्वच्छ हात धुणे या कोव्हीडच्या त्रिसूत्रीचे पालन करावे आणि कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करून सामाजिक आरोग्याला धोका निर्माण करू नये असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
०००००००००००००००००० ००००००००००००००००
नवी मुंबई लाईव्हचे संपर्कासाठी कार्यालय :
संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील
कार्यालय : शॉप क्रं २, गोदावरी सोसायटी, प्लॉट क्रं ३०७-३०८, सेक्टर सहा, नेरूळ (प.), नवी मुंबई