फसवणूक झालेल्या रहीवाशांच्या मदतीसाठी पोलिस मुख्यालय ते मंत्रालय पाठपुरावा
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : उलवा येथील भुखंड क्रमांक १६९ वर साई बिल्डर बांधत असलेल्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये सदनिका खरेदीसाठी गुंतवणूक केलेल्या रहीवाशांच्या फसवणूकप्रकरणी अटकेत असलेल्या बिल्डर पितापुत्रांच्या फरार असलेल्या मॅनेजरचा युध्दपातळीवर शोध घेण्याची मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
साई बिल्डर हा सिवूडस येथील रहीवाशी असून त्यांनी उलवा येथे भुखंड क्रमांक १६९ वर इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीमध्ये सदनिका घेण्यासाठी रहीवाशांनी कोणी ३६ लाख, कोणी ११ लाख, कोणी ३ लाख असे बिल्डरला दिलेले आहेत. हा व्यवहार व जमा केलेली रक्कम करोडोंच्या घरात आहे. सदनिकांची कागदपत्रे बनविताना संबंधित बिल्डरने रहीवाशांची फसवणूक करताना बनावट कागदपत्रे बनवून संबंधितांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयातही प्रकरण सुरू आहे. या गुन्ह्यात बिल्डर पितापुत्राला पोलिसांनी अटक केली असली तरी जामिनासाठी बिल्डर पितापुत्रासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. परंतु या फसवणूकीच्या गुन्ह्यातील अजून एक मुख्य सुत्रधार असलेला बिल्डरचा व्यवस्थापक (मॅनेजर) अजूनही फरार आहे. या व्यवस्थापकाने (मॅनेजर) रहीवाशांकडून कंपनीच्या तसेच स्वत:च्याही नावाने धनादेश व कॅश जमा केलेली आहे. हा या फसवणूकीच्या साखळीतील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेला हा व्यवस्थापक (मॅनेजर) फरार असणे म्हणजे गुंतवणूक केलेल्या रहीवाशांसाठी धोकादायक बाब आहे. हा झारखंड येथे फरार झाल्याचे या प्रकरणात फसवणूक झालेल्या रहीवाशांचे म्हणणे आहे. पोलिस या मॅनेजरचा गंभीरपणे शोध घेत नसल्याने अजून त्याला अटक झाली नसल्याचे संबंधित प्रकरणातील बाधित रहीवाशांकडून सांगण्यात येत आहे. उद्या या पितापुत्राला जामिन मिळाल्यास व या मॅनेजरसोबत ते अन्यत्र फरार झाल्यास बिल्डरांकडून फसवणूक झालेल्या रहीवाशांना कधीही न्याय मिळणार नाही व त्यांच्या घामाचेही पैसे कधीही परत मिळणार नाही. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणात फरार असलेल्या बिल्डरच्या मॅनेजरला अटक करावी आणि फसवणूक झालेल्या रहीवाशांना त्यांच्या सदनिका अथवा गुंतवणूक केलेले पैसे परत मिळत नाहीत तोपर्यत या बिल्डर पितापुत्राला जामिन मिळू नये यासाठी न्यायालयात प्रयत्न करावेत. व्यवस्थापक फरार असणे म्हणजे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यासारखे आहे. त्यामुळे संबंधित रहीवाशांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी मॅनेजरला अटक करण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.