स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून नेरूळ येथील एनआरबी एज्युकेशनल सोशल अॅण्ड कल्चरल ट्रस्ट संचलित शिक्षण प्रसारक विद्यालयात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती सानपाडा शाखेतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त चमत्कारामागील विज्ञान हा विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणारा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन रूजविणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अंधश्रध्दा हे मानसिक गुलामगिरीचे लक्षण असून, विद्यार्थ्यांनी जीवनातील प्रत्येक घटनेकडे डोळसपणे पाहिले पाहिजे, असा संदेश यावेळी एनआरबी एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नामदेव भगत यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेतील विज्ञान शिक्षक शेखर जगताप यांनी केले. महाराष्ट्र अंनिसचे अशोक निकम यांनी प्रबोधन कार्यक्रमातून आपल्या जीवनातील विज्ञानाचे महत्त्व अधोरेखीत केले. आरोग्य, दळणवळण, शिक्षण, उद्योग आदी सर्व क्षेत्रांची प्रगती विज्ञानाच्या वाटेने झाली आहे. विज्ञानाचे आकलन करताना आपला विवेक शाबुत ठेवला पाहिजे. आपला दृष्टीकोन वैज्ञानिक असला पाहिजे व त्याला सामजिकतेची जोड असली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये चौकसपणा यावा म्हणून यासाठी विविध चमत्कार सादर करून त्यामागचे विज्ञान उलगडून दाखविण्यात आले. नारळातून करणी काढणे, पाण्याने दिवा पेटविणे, हातातून उदी काढणे, मंत्र उच्चारून यज्ञ पेटविणे व प्रार्थनेने प्रसाद तयार करणे हे चमत्कार सादर करून त्या चमत्कारामागील विज्ञान समजावून सांगितले. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.