नवी मुंबई : वाशी रेल्वे स्टेशननजीकचे इर्नाबिट मॉलसमोरील सेक्टर ३० येथील वाहनतळ लवकरात लवकर सुरू करून उद्योग क्षेत्रातील सेवा पुरविणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची गैरसोय दूर करण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाला निर्देश देण्याची लेखी मागणी ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी एका निवेदनातून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
वाशी रेल्वे स्टेशननजीक इर्नाबिट मॉलसमोरील जागेत सेक्टर ३० मध्ये नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे विस्तिर्ण स्वरूपात वाहनतळ आहे. या वाहनतळामध्ये अंदाजे १०० हून अधिक अवजड वाहने उभी राहत असल्याने वाहतुक व्यवसायिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नसे व महापालिका प्रशासनाला त्यातून महसूलही उपलब्ध होत असे. परंतु वाहनतळाविषयी ठेकेदाराचा ठेका संपुष्ठात आल्याने महापालिका प्रशासनाकडून एक महिन्याहून अधिक काळ हे वाहनतळ बंद करण्यात आले आहे व त्यामुळे वाहन व्यावसायिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. पूर्वी वाहनतळ सुरू असताना येथील वाहनचालक स्वत:चे दोन-चार कर्मचारी वाहनतळाच्या ठिकाणी मुक्कामी ठेवत असल्याने अवजड वाहनाचे व वाहनाच्य आतील मालाचे रक्षण होत असे. मालाची कोणत्याही प्रकारची चोरी होत नसे व वाहनांनाही कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नसे. वाहनतळापासून वाशी रेल्वे स्टेशन हाकेच्या अंतरावरच असल्याने कर्मचाऱ्यांचीही घरी येण्या-जाण्याकरीता कोणत्याही प्रकारची गैरसोय होत नसे. परंतु आता वाहनतळच बंद झाल्याने उद्योग क्षेत्रातील सेवा पुरविणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना आता आपली वाहने रस्त्यांच्या कोपऱ्यावर, मैदाने अथवा मिळेल त्या सार्वजनिक ठिकाणी उभी करावी लागत आहे. त्यामुळे वाहनातून माल चोरीला जाणे, वाहनाचे टायर तसेच वाहनातून डिझेल चोरीला जाणे अशा विविध समस्यांचा सामना आता ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना करावा लागत असून त्यात त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. याशिवाय रस्त्यावर वाहन उभी केल्याने वाहतूक पोलिसांकडून इ चलान फाडले जाते, तोही आर्थिक दंड भरावा लागत असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
सेवा क्षेत्राशी संबंधित वाहनचालकांना वाहनतळ बंद पडल्याने वाहनांची व वाहनांतील मालाची चोरी, डिझेल चोरी, वाहतुक पोलिसांचा दंड, पार्किग करताना नवनव्या जागांचा शोध यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. महापालिका प्रशासनाला हे वाहतुकदार आजही पार्किग शुल्क भरण्यास तयार आहेत. ठेकेदार मिळेल तेव्हा मिळेल, तोपर्यत पालिकेने दोनचार कंत्राटी कामगार या ठिकाणी नेमणूक करून पार्किग शुल्क जमा करावे. वाहतुक व्यवसायिकांचे होत असलेले नुकसान पाहून नवी मुंबई महापालिका प्रशासनाला लवकरात लवकर वाहनतळ सुरू करण्याचे निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या विषयावर संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनाही स्वतंत्रपणे निवेदन दिले आहे.