संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : १ नोव्हेंबर २००५ नंतर महापालिका सेवेत रूजू झालेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती योजना (एनपीएस) लागू करण्याची लेखी मागणी कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिकेची राज्यातील श्रीमंत व सधन महापालिकेमध्ये गणना होत असून मोरबेसारखे महापालिकेकडे स्वमालकीचे धरण आहे. स्वच्छता अभियानांतर्गत दर वर्षी कोट्यावधी रूपये खर्च करूनही महापालिकेच्या तिजोरीवर कोणत्याही प्रकारचा ताण पडत नाही. अडीच हजार कोटी रूपयांच्या या महापालिकेच्या ठेवी (एफडी) आहेत. केंद्र व राज्य स्तरावर या महापालिका प्रशासनाला सातत्याने पुरस्कारांचा वर्षाव होत आहे. महापालिका प्रशासनात १ नोव्हेंबर २००५ नंतर रूजु झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागाने शासन निर्णय क्रं संकिर्ण – २०२१/प्र.क्र. ११९/नवि-२० दि. २२ फेब्रुवारी २०२२ अन्वये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू करण्यास मान्यता मिळालेली आहे. १ नोव्हेंबर २००५ नंतर महापालिकेत रुजू झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचा लाभ देण्यात येत आहे. तथापि परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना आता पूर्णपणे संपुष्ठात आलेली आहे. २२ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्य सरकारने राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना १ नोव्हेंबर २००५ नंतर रूजू झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारच्या सूचनांचे व निर्देशांचे अनेक स्वराज्य संस्थांनी पालन करताना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना १ नोव्हेंबर २००५ नंतर रूजू झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी लागू केलेली आहे. तथापि आपल्या महापालिकेत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अजूनही लागू करण्यात आलेली नाही. राज्य सरकारचे निर्देश, संपुष्ठात आलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना आणि महापालिकेची सधन आर्थिक परिस्थिती पाहता, संबंधित विभागाला दि. १ नोव्हेंबर २००५ नंतर महापालिका सेवेत रूजू झालेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती योजना (एनपीएस) लागू करण्याचे निर्देश देवून संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
0000000000000000000000000 0000000000000000000000000000000
नवी मुंबई लाईव्हचे कार्यालय : शॉप क्रं २, गोदावरी सोसायटी, प्लॉट ३०६/३०७, सेक्टर सहा, नेरूळ (प.), नवी मुंबई