नवी मुंबई : शिक्षण विभागातील सुरक्षा रक्षक या संवर्गातील बहूउद्देशिय कामगारांच्या प्रलंबित समस्या सोडवून सिध्दीविनायक सर्व्हिसेस या ठेकेदारावर कारवाई करण्याची लेखी मागणी कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
शिक्षण विभागातील सुरक्षा रक्षक या संवर्गातील बहूउद्देशिय कामगारांना गेल्या अनेक महिन्यापासून सिध्दीविनायक सर्व्हिसेस ठेकेदाराकडून होत असलेला अन्याय सहन करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्यांची आणि होत असलेल्या अन्यायाची प्रशासनकडून दखल घेतली जात नाही. प्रशासन कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवून त्यांना दिलासा देण्याएवजी पालिका प्रशासन ठेकेदाराला आजवर पाठीशी घालण्याचे काम करत असल्याने ठेकेदाराचे फावले आहे आणि प्रशासनाने आपल्याला वाऱ्यावर सोडले असल्याची नैराश्य आज कामगारांमध्ये निर्माण झाली असल्याचे कामगार नेते रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
सिध्दीविनायक सर्व्हिसेस या ठेकेदाराकडून सुरक्षा रक्षक या संवर्गातील बहूउद्देशिय कामगारांना दोन महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. या कर्मचाऱ्यांच्या पीएफ व ईएसआयचाही ठेकेदाराकडून भरणा करण्यात येत नाही. कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन मिळत नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतन जमा होणाऱ्या बॅंक खात्याची माहिती तपासल्यास सर्व गोष्टींचा उलगडा होईल. वेतन विलंब, नियमानुसार न दिले जाणारे वेतन, पीएफ व ईएसआयचा भरणा न करणे याबाबत महापालिका प्रशासनाने चौकशी करून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायप्रकरणी ठेकेदारावर कारवाई करणे आवश्यक आहे. महापालिकेचे काम कर्मचारी करत असतात, मग ठेकेदाराला महापालिका प्रशासन का पोसत आहे? कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असतानाही महापालिका प्रशासन ठेकेदाराला का पाठीशी घालत आहे. महापालिकेला कर्मचाऱ्यांचे हित जोपासायचे का ठेकेदाराला सांभाळायचे याबाबत पालिका प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक आहे. शिक्षण विभागातील सुरक्षा रक्षक या संवर्गातील बहूउद्देशिय कामगारांच्या प्रलंबित समस्या सोडवून सिध्दीविनायक सर्व्हिसेस ठेकेदारावर कारवाई करून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.