नवी मुंबई : कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुराव्याला यश आले आहे. कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिका परिवहन उपक्रमाच्या चालक आणि वाहक यांना तीन लाखाचा मेडीक्लेम मंजूर करण्यात आला आहे.
कामगार नेते रवींद्र सावंत यांनी परिवहनच्या कर्मचारी शिष्टमंडळासमवेत महापालिका मुख्यालयात परिवहन व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांची भेट घेतली असता त्यांनी परिवहन उपक्रमातील चालक- वाहकांना तीन लाख रूपयांचा मेडिक्लेम देण्याचे मान्य केले.
या बैठकीत सफाई कर्मचारी व ठोक मानधनावरील कर्मचारी यांच्या समस्या व असुविधांबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली . सफाई कामगारांबाबत कामगार नेते रवींद्र सावंत यांनी १) सफाई कर्मचाऱ्यांचा प्रशासनाकडे थकीत असलेला एरियस एकाच टप्प्यात कामगारांना देण्यात यावा. २) या सफाई कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनामध्ये ४९० रूपये वेतन वाढ करण्यात यावी. ३) सफाई कर्मचाऱ्यांना कापड आणि शिलाईचे पैसे परिवहन विभागाकडून देण्यात यावे. ४) आशिर्वाद या ठेकेदाराने कार्पोरेशन बॅंक व पारसिक बॅंकमध्ये स्वत:चे खाते उघडावे, जेणेकरून आशिर्वादच्या कर्मचाऱ्यांचे वेतन परिवहन विभाग ठेकेदाराला ज्या दिवशी धनादेश देईल, त्याच दिवशी बॅंकेत जमा होईल. ५) सफाई कर्मचारी हे परिवहन उपक्रमाचेच कर्मचारी आहेत. परिवहन उपक्रमाकडूनच गणवेशाचे कापड आणि शिलाई मिळणे आवश्यक आहे. ६) कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात रेनकोट अथवा छत्री घेण्यासाठी परिवहनने बिलाची वाट न पाहता जुनच्या पहिल्या आठवड्यातच मे महिन्याच्या वेतनासोबतच छत्री व रेनकोटची किंमत त्यांच्या खात्यात जमा करावी, आदी मुद्दे उपस्थित केले.
ठोक मानधनावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत बोलताना कामगार नेते रविंद्र सावंत यांनी १) ठोक मानधन व रोजदांरी चालक, वाहक, मॅकनिक व मदतनीस यांना कायम करणेबाबत, २) २०१० च्या ठरावाच्या अनुषंगाने वेतनश्रेणी लागू करणे व त्याचा फरक कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करणेबाबत, ३) कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुट्ट्या (पीएच) लागू करणेबाबत, ४) शासन मंजुरीच्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात, ५) परिवहनमधील उर्वरित कर्मचाऱ्यांचा पीएफ कपात करणेबाबत व मेडिक्लेम पॉलिसी लागू करणेबाबत, कामावर ब्रेक देण्याची पध्दती कायमस्वरूपी बंद करणेबाबत, ६) महापालिका प्रशासनाने दोन वर्षानंतर डिसेंबर महिन्यात अवघ्या दोन हजार रूपयांची तुटपुंजी वेतनवाढ दिलेली आहे. ती वेतनवाढ वाढवून दहा हजार रूपये करण्यात यावी, ७) कर्मचाऱ्यांकडून चुकून अपघात झाल्यास, चालकांकडून प्रतीदिन २०० रूपये जी ट्रेनिंग फी वसूल करणे बंद करणेबाबत, ८) चालक-वाहक ठोक मानधन व रोजंदारी सेवेनुसार त्यांना सेवा (ड्यूटी) देण्यात यावी. मग उर्वरित कामगार, स्पेअर कामगार, कंत्रादटार देण्यात यावे आदी समस्या मांडल्या.
बैठकीत परिवहन व्यवस्थापकांनी मेडीक्लेम देण्याचे मान्य करतानाच सफाई कर्मचाऱ्यांचा एरियस एकाच टप्प्यात देण्याचे तसेच परिवहन उपक्रमातील मॅकनिकल, मदतनीस यांनाही कायम करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याचे मान्य केले. रविंद्र सावंत यांच्यामुळे मेडिक्लेम, एरियस यासह कायम सेवेसाठी प्रस्ताव पाठविण्याचे परिवहन व्यवस्थापकांनी मान्य केल्याने परिवहनच्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून सर्व कामगार रविंद्र सावंत यांचे आभार मानू लागले आहेत.