विठ्ठल ममताबादे
उरण : कोकणात अनेक सण व विविध देशी खेळ वर्षानुवर्षे पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरे केले जातात. मात्र होळी सणाच्या १० दिवस अगोदर संपूर्ण कोकणात खेळला जाणारा आट्यापाट्या खेळ सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
आट्या पाट्या हा महाराष्ट्रातील एक मैदानी खेळ आहे. भारतातील अनेक राज्यात हा खेळ वेगवेगळ्या नावांनी खेळला जातो. महाराष्ट्रात संत तुकारामांच्या काळात हा खेळ प्रचलित असल्याचे तुकाराम महाराजांच्या अभंगावरून दिसून येते असे काही तज्ञाचे मत आहे. एका संघातील खेळाडूंनी दुसऱ्या संघातील खेळाडूंना ठराविक जागेमध्ये (पाटीत /चौकोनी डब्ब्यात )अडविणे व अडविलेल्या खेळाडूंना हुलकावणी देऊन निसटून जाणे असे या खेळाचे स्वरूप आहे.या मैदानी खेळात कोंडी, हुलकावणी, शिवाशिवी अशा प्रकारांचा समावेश आहे. कोकणात हा खेळ होळीच्या १० दिवस अगोदर पासून सुरु होतो. व होळीच्या दिवशी समाप्त होतो. सर्वजण हा खेळ मोठ्या आनंदाने खेळत असतात. ग्रामीण भागात हा खेळ मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे.
आट्या पाट्या हा असा खेळ आहे की जो दोन संघामध्ये खेळला जातो आणि हे संघ एकमेकांविरुद्ध खेळत असताना एका संघातील खेळाडू आपले ध्येय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढे जात असतात आणि त्यांच्या विरुद्ध संघातील खेळाडू त्याला ठराविक ठिकाणी अडविण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु ध्येय पूर्ण करण्यासाठी खेळत असणाऱ्या खेळाडूला त्याच्या विरुद्ध खेळाडूला हुलकावणी देऊन त्याच्या हातून निसटून पुढे जायचे असते. एकमेकांच्या पाठी लागणे. पाठ शिवणे, एखाद्या खेळाडूला अडवून ठेवणे, त्याची कोंडी करणे, हुलकावणी देणे या प्रकारांचा या खेळात समावेश होतो.
सध्या आट्या पाट्या हा कोकणातील खेळ कोकणातून हद्दपार होत आहे. भारताच्या प्राचीन परंपरे पैकी एक असलेल्या आट्या पाट्या हा खेळ कोकणातील ग्रामीण भागात प्रसिद्ध आहे. हा खेळ आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर खेळला जाणारा हा खेळ हल्लीच्या मुला मुलींना माहित नाही. किंवा कसे खेळावे, कुठे खेळावे, खेळाचे नियम व अटी काय आहेत. याची माहिती सुद्धा अनेकांना नाही. पूर्वीच्या लोकांनी जपून ठेवलेला हा वारसा आता नामशेष होत आहे. केंद्र व राज्य शासनाने या खेळासाठी विशेष आर्थिक निधीची तरतूद करून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत या खेळाचा समावेश केल्यास नक्कीच या खेळाला चांगले दिवस येतील. यासाठी सर्वांनी आपली ही संस्कृती जपण्याची गरज निर्माण झाली आहे.