नवी मुंबई : महापालिका प्रभाग ७६ मधील नागरी समस्यांचे निवारण करण्याची मागणी सानपाडा नोडमधील भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी एका लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात पांडुरंग आमले यांनी १) पावसाळी कामकाजाबाबत :- पावसाळा येण्यास आता अवघा अडीच महिन्याचा कालावधी राहीला आहे. प्रभाग ७६ मधील सानपाडा सेक्टर २,३,४.८ या परिसरात पावसाळी कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावीत. ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावर खोदकाम केले असेल , त्या ठिकाणी रस्त्यांची डागडूजी तसेच सपाटीकरण करण्यात यावे. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. तसेच विभागातील सर्व गटारांची तळापासून सफाई करण्यात यावी. माती व तुंबलेला कचरा, गाळ काढल्यास पाणी कोठेही चोकअप होणार नाही.
२) धुरीकरणाबाबत : परिसरातील रहीवाशी डासांच्या त्रासापासून त्रस्त झाले आहेत. मलेरिया व अन्य आजाराचेही आजही रूग्ण आढळून येत आहे. सानपाडा सेक्टर २,३,४,८ परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बाहेरूनच नाही तर अंर्तगत भागातही सातत्याने धुरीकरण करून डास निर्मूलन मोहीम राबविण्यात यावी. याशिवाय परिसरातील गटारांमध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात यावी. विभागातील डास नियत्रंणात आल्यास साथीचे आजार नियत्रंणात येवून त्यावर मात करणे शक्य होईल असे म्हटले आहे.
प्रभाग ७६ मधील सानपाडा सेक्टर २,३,४,८ मधील गटारांची तळापासून सफाई मोहीम राबवावी आणि साथीचे आजार नियत्रंणात आणण्यासाठी डास निर्मूलन मोहीम राबवावी यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी समाजसेवक व सानपाडा नोडमधील भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी निवेदनात म्हटले आहे.