नवी मुंबई : नेरूळ व जुईनगरमधील कामकाजामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून रस्त्याची डागडूजी करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त आणि नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
मल:निस्सारण वाहिनी, जलवाहिनी, गॅस केबल, इंटरनेट काम अथवा अन्य कामांसाठी रस्त्यावर खोदकाम केले जाते. विकासकामांसाठी रस्त्यावर खोदकाम करणे अनिवार्य आहे, हे सर्वांना मान्य आहे. तथापि काम झाल्यावर रस्त्याची डागडूजी तात्काळ करणे हे महापालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. तथापि काम झाल्यावरही खोदकाम बुजविले न गेल्याने त्या त्या भागातील स्थानिक रहीवाशांना समस्यांचा सामना करावा लागतो. परिणामी वाहतुक कोंडी, धुराळा व अन्य समस्यांचा सामना करताना स्थानिक रहीवाशांच्या आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम होत असतो. महापालिका प्रशासनाकडून नेरूळ सेक्टर दोन येथील मलनिस्सारण केंद्राजवळील चौक (नर्सरी व एलआयजीमधील रस्ता) तसेच जुईनगर सेक्टर २५ येथील तिरंगा, जुई, आनंदवन, भारत या सिडकोच्या गृहनिर्माण सोसायटीसमोरील रस्ता येथे विकासकामे करताना रस्त्यांचे खोदकाम केलेले आहे. तथापि काम संपल्यावरही रस्त्याची डागडूजी न झाल्याने स्थानिक रहीवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. आपण तात्काळ त्या ठिकाणच्या रस्त्यावरील खड्डे बुजवून डागडूजी करून स्थानिक जनतेला दिलासा देण्याची मागणी श्रीमती विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.