संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील :Navimumbailive.com@gmail.com
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील बैठकीत सध्या अटकेत असलेले राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याशी संबंधित मोठे निर्णय पक्षाने घेतले आहेत. आघाडी सरकारने मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला नसला तरी देखील त्यांच्याकडे असलेल्या विभागाचा कार्यभार इतर मंत्र्यांकडे सोपविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. तसेच मलिक यांच्याकडील परभणी आणि गोंदिया या जिल्ह्यांची पालकमंत्रिपदे देखील इतर मंत्र्यांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, मलिकांकडे असलेले परभणीचे पालकमंत्रिपद धनंजय मुंडे आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हे प्राजक्त तनपुरे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर पाटील हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर पाटील हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. नवाब मलिक सध्या अटकेत असल्याने त्यांच्या विभागाची कामे थांबू नयेत यासाठी पक्षाने हा मार्ग काढला असून हा तात्पुरता निर्णय असल्याचे पाटील म्हणाले. मात्र, पक्षाने मलिक यांच्याकडील विभाग इतर मंत्र्यांकडे वर्ग करण्याबाबतच्या पक्षाच्या निर्णयाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती देत त्यांच्याशी चर्चा केली जाईल असेही पाटील म्हणाले.