स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : पीएफच्या कामासाठी वाशी येथील पीएफच्या कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निवारण न झाल्यास पीएफच्याच कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा नवी मुंबई इंटक अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी दिला आहे.
वाशीतील पीएफ कार्यालयात होणाऱ्या अन्यायाबाबत कर्मचाऱ्यांनी नवी मुंबई इंटक अध्यक्ष
रविंद्र सावंत यांच्याकडे पाढा वाचल्यावर संतप्त होत कामगार नेते रविंद्र सावंत यांनी वाशीतील पीएफ कार्यालयावर धडक देत तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कंपनी, कारखाने, शासकीय,निमशासकीय आस्थापनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या वेतनातून कापला जाणारा पीएफसाठीची रक्कम ही बाब त्यांच्यासाठी महत्वाची असते. सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या पु्ढील आयुष्यातील उपजिविकेसाठी पीएफमध्ये जमा होणारी रक्कम त्यांच्यासाठी तारणहार असते. आपल्या वाशी येथील पीएफ कार्यालयात केवळ नवी मुंबईतूनच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून पीएफविषयक समस्यांचे निवारण करण्यासाठी येत असतात. कोणी सेवानिवृत्त होवून पीएफची रक्कम मिळालेली नसते. पीफ रकमेबाबत संभ्रम असल्याने त्याची खातरजमा करून घ्यायची असते. अनेक कंपन्या, कारखान्यात मालकवर्गाने वेतनातून पीएफची रक्कम कापूनही पीएफमध्ये भरलेली नसते. हे जाणून घेण्यासाठी तसेच पीएफबाबत अन्य समस्यांबाबत माहिती मिळविण्यासाठी कर्मचारी आपल्या वाशी कार्यालयात येतात, त्यावेळी या कर्मचाऱ्यांना पीएफ खात्यातील संबंधित कर्मचाऱ्यांची भेट घेवून दिली जात नाही. कार्यालयातही सोडले जात नाही. जे काही आहे, ते ऑनलाईन करा. ऑनलाईन अर्ज केला आहे ना, मग ऑनलाईन सर्व माहिती भेटेल अशी उर्मटपणाची उत्तरे देवून कर्मचाऱ्यांना पीएफ कार्यालयात घेतले जात नाही. हा काय प्रकार आहे? कर्मचारी काम करतात, त्यांच्या वेतनातून पीएफ कापला जातो. ऑनलाईन माहिती न मिळाल्याने तसेच समस्यांचे निवारण न झाल्याने कर्मचारी आपल्या वाशी कार्यालयात येतात आणि त्यांना कार्यालयात न घेता, कोणतीही माहिती न देता परत ऑनलाईनचे कारण सांगत परत पाठविले जाते. मुळातच हा सर्व संतापजनक प्रकार आहे. पीएफबाबत ऑनलाईन समाधान न झाल्यानेच कर्मचारी आपल्या कार्यालयात येतात. हा प्रकार तात्काळ थांबविण्याच्या आपण संबंधितांना सूचना द्या. पीएफबाबत अडचणी घेवून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी तुमच्या कार्यालयातील कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्या. संबंधितांना पीएफ कार्यालयात प्रवेश द्या. उन्हातान्हात तो लांबवरून पीएफबाबत माहिती जाणून घेण्यासाठी आलेला असतो. कर्मचाऱ्यांच्या पीएफबाबतच्या समस्यांचे निवारण न झाल्यास व कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रवेश न मिळाल्यास नवी मुंबई इंटकच्या वतीने आपल्या कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडले जाईल असा इशारा नवी मुंबई इंटक अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी चर्चेदरम्यान पीएफ कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला आहे.