पालकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या खाजगी क्लासेसच्या संचालकांविरोधात कारवाई करण्याची मागणी
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात खाजगी क्लासेसचे पेव फुटलेले आहे. कोविड कालावधीमध्ये विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत असताना पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांवर शैक्षणिक परिणाम होऊ नये म्हणून खाजगी क्लासेस मध्ये सुध्दा प्रवेश घेतला परंतु काही खाजगी क्लासेसने पालकांना व विद्यार्थ्यांना खोट्या बतावण्या मारून लाखो रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे नवी मुंबईतील पालकांनी केली आहे. न्यू क्लियस करियर अकॅडमीने पालकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल खोटी माहिती देऊन लाखो रुपये उकळले व सध्या विद्यार्थी व पालकांसोबत संपर्क तोडून संबंधित खाजगी क्लासेसच्या संचालकांनी पोबारा केला आहे. या संबंधीची तक्रार प्राप्त होताच मनविसेने आक्रमक भुमिका घेत शिक्षण मंत्री, शिक्षण उपसंचालक, पोलिसआयुक्त नवी मुंबई पोलिस यांच्याकडे संबंधित खाजगी क्लासेसची तक्रार करत कारवाईची मागणी केलेली असल्याचे मनविसे शहर अध्यक्ष संदेश डोंगरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे सांगितले आहे.
पालकांच्या तक्रारीनुसार न्यू क्लियस करियर अकॅडमीने विविध प्रकारची प्रलोभनिय जाहिरातबाजी करून पालकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार मिळाली त्याचबरोबर न्यू क्लियस करियर अकॅडमीच्या चित्तरंजन जैन यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना कोविड कालावधीमध्ये ऑनलाईन शिक्षण देतो सोबत जे ई ई व नीट परीक्षांचा अभ्यास देखील शिकवतो असे मान्य केले. त्यानंतर शासनाचे कोविड नियम शिथिल झाल्यानंतर ऑफलाईन क्लासेस घेण्याकरिता पालक व विद्यार्थ्यांना तगादा लावला असताना सदर संस्था चालकांनी पालकांशी व विद्यार्थ्यांसोबत पूर्णपणे संपर्क तोडून पोबारा केला असल्याची बाब तक्रारीत पालकांनी नमूद केलेली आहे असे मनविसे शहर अध्यक्ष संदेश डोंगरे यांनी कळविले आहे.
याची गांभीर्याने दखल घेत मनविसे नवी मुंबईने संबंधीत खाजगी क्लासेसच्या विरोधात मा.पोलिस आयुक्तांना तक्रार करीत पालकांचे पैसे मिळवून देण्याची लेखी मागणी केली आहे व पुन्हा अश्या घटनांना आळा बसावा या करिता सदर खाजगी क्लासेसच्या मालक व संचालकांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर योग्य तो गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली असल्याचे मत संदेश डोंगरे यांनी मांडले आहे.