नवी मुंबई : महापालिका प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६,१६ए आणि १८ या विभागातील गटारांची तळापासून सफाई करण्याची मागणी जनसेवक गणेश भगत यांनी महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
पावसाळा पावणे दोन महिन्यावर आलेला आहे. पावसाळीपूर्व कामांना परिसरात सुरूवात होणे आवश्यक आहे. नेरूळ सेक्टर १६, १६ए आणि १८ मधील सर्व गटारांची तळापासून सफाई होणे आवश्यक आहे. जेणेकरून पाऊस पडल्यावर कोठे पाणी तुंबणार नाही व प्रभागात पाणी साचून साथीच्या आजारांना खतपाणी मिळणार नाही. आता कोरोना महामारीच्या सावटातून नवी मुंबई पूर्णपणे मुक्त झालेली आहे. त्यामुळे प्रभागातील नागरी कामांना गती मिळणे आवश्यक आहे. गटारांची लवकरात लवकर तळापासून सफाई झाल्यास व गटारातून काढलेला कचरा त्वरीत घेवून गेल्यास दुर्गंधीही कमी होईल. संबंधिताना नेरूळ सेक्टर १६, १६ए आणि १८ मधील गटारांची तळापासून सफाई करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी जनसेवक गणेश भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.