अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील सिडको वसाहतीमधील महापालिकेच्या उद्यानात असणाऱ्या ओपन जीमवर शेड उभारण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये सिडको वसाहतीत सागरदिप, वरूणा, दत्तगुरु, सिव्ह्यू, एव्हरग्रीन या सिडकोच्या सोसायटीच्या मध्यभागी महापालिकेचे उद्यान व क्रिडांगण आहे. या उद्यानाच्या एका कोपऱ्यावर महापालिका प्रशासनाने स्थानिक भागातील रहीवाशांसाठी ओपन जीम कार्यान्वित केली आहे. स्थानिक रहीवाशांना व्यायामासाठी महापालिका प्रशासनाने खरोखरीच चांगली सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. अवघ्या दीड महिन्यावर पावसाळा आलेला आहे. विभागातील रहीवाशी, महिला, ज्येष्ठ नागरिकही ओपन जीममध्ये व्यायाम करत असतात. करदात्या नवी मुंबईकरांच्या पैशाचा चांगला विनियोग ओपन जीमच्या माध्यमातून झालेला आहे. पावसाळ्यात पडणाऱ्या संततधार पावसामध्ये ओपन जीमचे साहित्य खराब होण्याची अथवा गंजण्याची भीती आहे. स्थानिक रहीवाशांना पावसाळ्यातील चार महिने शेड नसल्यास व्यायाम करता येणार नाही. त्यामुळे ओपन जीमच्या वर महापालिका प्रशासनाने लोखंडी अथवा सिमेंटच्या पत्र्याची अथवा कायमस्वरूपी स्लॅबची शेड उभारल्यास पावसाळ्यात जीमचे साहित्यही खराब होणार नाही. पावसाळ्यात स्थानिक रहीवाशांना ओपन जीममध्ये व्यायाम करणे शक्य होईल. याबाबत स्थानिक रहीवाशांच्या मागणीवर सकारात्मक विचार करून आपण संबंधितांना ओपन जीमवर शेड उभारण्याचे निर्देश देवून रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.