नवी मुंबई : नेरूळ प्रभाग ८५ व ८६ मधील नादुरूस्त जुने पथदिवे हटविणे व नव्याने अर्धवट अवस्थेत बसविण्यात आलेले पथदिवे कार्यान्वित करण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार यांनी लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
नेरूळ नोडमध्ये महापालिका प्रभाग ८५ व ८६ मध्ये बसविलेल्या पथदिव्यांबाबत महादेव पवारांनी या निवेदनातून पालिका आयुक्तांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. पावसाळा आता जेमतेम एक महिन्यावर आलेला आहे. पालिका प्रशासनाने काही ठिकाणी नव्याने पथदिवे बसविले आहेत. तथापि नव्याने बसविण्यात आलेल्या पथदिव्यातून जुन्या पथदिव्यांच्या तुलनेत प्रकाश कमी व अंधुक येत असल्याचा रहीवाशांकडून सांगण्यात येत आहे. या नवीन पथदिव्याच्या बाजूला जे जे जुने पथदिवे असतील तगे त्वरित काढून टाकण्यात यावेत. तसेच काही रस्त्यावर नवीन पथदिवे बसविण्यात आले आहेत. तथापि हे पथदिवे कार्यान्वित न झाल्याने केवळ सांगाडे उभे आहेत. हे पथदिवे बल्ब बसवून कार्यान्वित करण्याचे आपण संबंधितांना निर्देश द्यावेत. प्रभाग ८५ व ८६ मधील नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे तसेच कुकशेत गावातील पथदिव्यांची पाहणी करून केबल्सची तपासणी करावी. अंधुक प्रकाश जिथे असेल तिथे नव्याने बल्ब बसवावेत, छोट्या छोट्या चौकात छोटेखानी हायमस्ट बसवावेत. रहीवाशांना पुरेसा उजेड रस्त्यावर उपलब्ध झाल्यास चोऱ्यांच्या प्रकारालाही आळा बसेल. आपण संबंधितांना प्रभाग ८५ व ८६ मध्ये पथदिव्याच्या डागडूजीचे व अन्य त्याविषयीच्या समस्यांचे निवारण करण्याचे निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.