नवी मुंबई : नेरूळ प्रभाग ९६ मधील पाण्याच्या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची लेखी मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी महापालिका नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे.
नेरूळ नोडमधील महापालिका प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६,१६ए आणि १८ या परिसराचा समावेश होत आहे. गेल्या काही महिन्यापासून विभागातील रहीवाशांना पाणीसमस्येचा सामना करावा लागत आहे. पूर्वी पहाटे ४ ते सकाळी ९ व रात्री ८ ते १० असे दोन तास पाणी येत होते. आता मात्र पहाटे ५.३० ला पाणी येते व सकाळी ८.३० ला जाते आणि रात्री ८.३० ला येवून ९.३० ला जात असल्याचे स्थानिक रहीवाशांकडून सांगण्यात येत आहे. एकीकडे पाणी कमी वेळेत येत असताना दुसरीकडे पाणी कमी दाबाने येत आहे. यामुळे स्वमालकीचे धरण असणाऱ्या नवी मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महिला वर्गाला पाणीटंचाईचा खुप त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासन पाणीसमस्येचे निवारण करत नसेल तर दररोज पाणीसमस्येचे निवारण होईपर्यत विभागातील प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीला किमान १५ ते १६ पाण्याचे टॅकर विनामूल्य उपलब्ध करून द्यावेत., पाण्याचे देयक महापालिका प्रशासन आकारत असताना पाणी कमी दाबाने सोडून रहीवाशांना त्रास देण्याचा महापालिकेला कोणताही अधिकार नाही. आपण समस्येचे गांभीर्य पाहता पाणी पूर्वीच्याच वेळेत स्थानिक रहीवाशांना मिळावे व पाण्याचा प्रवाहही कमी दाबाने असू नये यासाठी संबंधितांना निर्देश देवून स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी केली आहे.