सौ. सुवर्णा खांडगेपाटील : संपादक : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनात कंत्राटदाराच्या माध्यमातून काम करणाऱ्या कंत्राटी वाहनचालकांच्या वेतनात वाढ करून त्यांना वेतन वेळेवर देण्यात यावे तसेच या कंत्राटी वाहनचालकांचा पीएफ न भरणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिकेत ‘समान कामाला, समान वेतन’ हे अनेक वर्षापासून केवळ ऐकावयास मिळत आहेत, परंतु प्रत्यक्षात समान कामाला समान वेतन कागदावरच आजतागायत आलेच नाही. महापालिकेच्या वाहन विभागात कंत्राटदारांच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्व कंत्राटी वाहन चालकांना केवळ १२ ते १३ हजारावर रुपये या मासिक वेतनावरच काम करावे लागत आहे. महापालिकेत काम करणाऱ्या सफाई कामगारांना मात्र १८ ते २० हजार वेतन दिले जात आहे. हा दुजाभाव कशासाठी? कंत्राटी वाहनचालकांना मिळणारे वेतन महागाईच्या तुलनेत हे वेतन तुटपुंजेच आहे. अन्य कायम सेवेतील वाहनचालकांचे वेतन पाहता समान कामाला समान वेतन तर सोडा, समान कामाला अर्धे वेतनही या कंत्राटी वाहन चालकांना मिळत नाही. इतक्या अत्यल्प वेतनात घरभाडे, कौंटूबिक खर्च, मुलांचे शिक्षण व अन्य खर्च भागविणेही शक्य होत नाही. त्यामुळे या वाहन चालकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आलेली आहे. वारंवार प्रशासनाकडे अर्ज, विनंत्या करूनही संबंधित वाहनचालकांची वेतन वाढ करण्यात आलेली नाही. या कंत्राटी पध्दतीवर कार्यरत असणाऱ्या वाहन चालकांचे पीएफही ठेकेदारांकडून वेळेवर भरले जात नाही. त्यामुळे वाहनचालकांच्या पीएफचा वेळेवर भरणा न करणाऱ्या ठेकेदाराला लवकरात लवकर काळ्या यादीत टाकणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर वाहन विभागातील कंत्राटी वाहनचालकांना सध्याची महागाई पाहता त्यांना अपेक्षित असलेली व प्रशासन देवू पाहणारी या वेतनवाढीत सन्मानजनक तोडगा काढून लवकरात लवकर या वाहनचालकांच्या वेतनात वाढ करावी आणि हे वेतन वेळेवर देण्याची मागणी कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
०००००००००००००० ००००००००००००००००००००० ००००००००००००००० ००००००००
कार्यालय : संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील, शॉप क्रं २, गोदावरी सोसायटी, प्लॉट ३०७-३०८, सेक्टर सहा, नेरूळ (पश्चिम), नवी मुंबई : संपर्क : ८३६९९२४६४६, Navimumbailive.com@gmail.com