नवी मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान होत असून सभागृहातील संख्याबळानुसार त्यापैकी सहा जागा महाविकास आघाडीच्या तर उर्वरित ४ जागा भाजपच्या पदरात पडणार आहेत. या विधानसभा निवडणूकीत कोणत्याही पक्षातील नवी मुंबईकराची वर्णी लागेल का, याचीच चर्चा नवी मुंबईच्या राजकारणात सुरू आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तगड्या मातब्बरांना संधी मिळेल का, ही चर्चा राजकारणातील चावडी गप्पांमध्ये सध्या सुरू आहे.
नवी मुंबईतील भाजप आमदार मंदाताई म्हात्रे (राष्ट्रवादीकडून), सध्याचे भाजपाचे विधान परिषद सदस्य रमेश पाटील, माथाडी नेते नरेंद्र पाटील, माथाडी नेते शशिकांत शिंदे, याची यापूर्वी विधान परिषदेवर वर्णी लागलेली असल्याने विधान परिषदेत नवी मुंबईचे अस्तित्व पहावयास मिळत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विचार करावयाचा झाल्यास अशोक गावडे व नामदेव भगत या दोन मातब्बरांचा राष्ट्रवादीकडून विचार होण्याची शक्यता आहे. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश केल्यावर निर्माण झालेल्या पडझडीच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस सांभाळण्याचे अग्निदिव्य अशोक गावडे यांनी सांभाळले होते. नवी मुंबई महापालिका सभागृहात दोन वेळा नगरसेवक तसेच नवी मुंबईचे उपमहापौरपदही त्यांनी सांभाळले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही त्यांनी भाजी मार्केटचे संचालकपद सांभाळले असून सहकार क्षेत्राचा त्यांना दांडगा अनुभव आहे. स्वत:ची त्यांची शैक्षणिक संस्थाही आहे. कट्टर शरद पवार समर्थक ही राज्याच्या राजकारणात त्यांची ओळख आहे. नवी मुंबईत दोन्ही भाजपचे आमदार असल्याने भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विशेषत: शरद पवारांकडून गावडे यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. नामदेव भगत याही नावाची चर्चा जोर धरत असून ठाणे जिल्ह्यातील राजकारणात गेली तीन दशके हे नाव चर्चेत आहे. नामदेव भगत हे महापालिकेच्या दुसऱ्या सभागृहापासून नगरसेवक असून महापालिकेचे विरोधी पक्षनेते तसेच सिडको संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. आगरी-कोळी समाजासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. भाजपने रमेश पाटील या कोळी समाजातील नेतृत्वाला विधान परिषदेवर पाठवून कोळी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रातील कोळी समाजाला विधान परिषदेत न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस नामदेव भगत या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.
शिवसेनेकडून विचार करावयाचा झाल्यास उपनेते विजय नाहटा व विजय चौगुले याच दोन नावा.चा विचार होवू शकतो. शिवसेनेला पडझडीच्या काळात नावारुपाला आणण्याचे, शिवसैनिकांना प्रोत्साहीत करून उत्साहीत करण्याचे कार्य विजय चौगुले यांनी केले आहे. कोरोना काळात संघटनेच्या शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांना सांभाळण्याचे काम विजय नाहटा यांनी केले आहे. भाजपमध्ये केवळ विधान परिषदेच्या नावाचा विचार होवू शकेल असे सध्या संदीप नाईक हे एकमेव नाव आहे. कोरोना काळात इतरांसारखी कोणतीही चमकेशगिरी न करता, प्रसिध्दीची स्टंटबाजी न करता नवी मुंबईकरांसाठी सर्वांधिक कार्य संदीप नाईकांनी केलेले आहे. सलग दोन वेळा आमदार असताना पक्षाने दिलेली तिकिट वडीलांना देवून नम्रपणे माघार घेणारे हे खऱ्या अर्थांने कलियुगातील श्रावण बाळ म्हटले पाहिजे.
विधान परिषदेच्या निवडणूक निमित्ताने राजकीय घडामोडींना पडद्याआड गती मिळाली आहे. माजी आमदार संदीप नाईक, विजय नाहटा, विजय चौगुले, नामदेव भगत, अशोक गावडे यापैकी कोणत्या नवी मुंबईकरांना संधी मिळणार याची चर्चा सुरू आहे. संधी कोणाला मिळू दे, पण विधान परिषदेत नवी मुंबईचे अस्तित्व वाढू दे असा आशावाद नवी मुंबईकरांकडून व्यक्त केला जात आहे.