अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२२ चे वेतन तसेच मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता देण्याची लेखी मागणी ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे. याच समस्येबाबत संदीप खांडगेपाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही स्वतंत्रपणे निवेदन सादर केले आहे.
मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांच्या विलंबाने होणाऱ्या वेतनाचे गांभीर्य पालिका प्रशासनाच्या व राज्य सरकारच्या निदर्शनास यावे यासाठी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनासह राज्य सरकारलाही निवेदन सादर केले आहे. मे महिन्याची आज ३० तारीख. मे महिना जवळपास संपल्यातच जमा आहे. मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना अजूनही एप्रिल २०२२ चे वेतन मिळालेले नाही. महापालिकेत काम करणाऱ्या सर्वच कंत्राटी व ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळत असताना केवळ मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांच्याच नशिबी पालिका प्रशासन व संबंधित ठेकेदारांच्या व या विभागाचे नियत्रंण सांभाळणाऱ्या उपायुक्तांच्या संगनमताने गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक ससेहोलपट होत आहे. वर्षानुवर्षे एकाच ठेकेदाराकडून मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असतानाही महापालिका त्याच ठेकेदाराला ठेका देण्याचे औदार्य दाखवित आहे. या ठेकेदाराच्या नावात जरी ‘मनी’ असा उल्लेख असला तरी मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांच्या घामाचा मनी (वेतन) गेल्या अनेक वर्षात त्यांना कधीही वेळेवर मिळालेला नाही. एप्रिल व मे महिन्याचे एकत्रित वेतन तातडीने मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना देण्याविषयी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.
कोरोना महामारी जवळपास संपुष्ठात आली आहे. प्रत्येक लाटेचा सामना महापालिका प्रशासनाच्या मदतीने नवी मुंबईकरांनी यशस्वीपणे सामना केलेला आहे. कोरोना महामारीच्या काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून प्रतीदिन कोव्हिड भत्ता देण्यात आलेला आहे. कोरोना महामारीच्या काळात मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कार्य केलेले आहे. त्यात कोणताही खंड पडला नाही. तथापि कोरोना महामारीमध्ये काम करूनही प्रशासनाकडून आजतागायत त्यांना एक रूपायाही कोव्हिड भत्ता देण्यात आलेला नाही. याप्रकरणी चौकशी करुन मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना तातडीने कोव्हिड भत्ता देण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.