अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील राजमाता जिजाऊ उद्यानातील खेळण्यांची दहा दिवसामध्ये दुरुस्ती न झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस ‘भिक मांगो’ आंदोलनातून खेळण्यांची दुरूस्ती करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर सहा परिसरातील सिडको वसाहतीमध्ये महापालिकेचे राजमाता जिजाऊ उद्यान आहे. या उद्यानाचा नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांकडून व सारसोळे ग्रामस्थांकडून वापर होत आहे. गेल्या दीड वर्षापासून उद्यानातील खेळण्यांची नासधूस झालेली असून या खेळण्यांच्या दुरूस्तीसाठी आम्ही व स्थानिक रहिवाशी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत असताना पालिका प्रशासनाकडून खेळण्यांची दुरूस्ती होत नाही. सुट्टीचा उन्हाळा गेला तरी स्थानिक रहीवाशांच्या व सारसोळे ग्रामस्थांच्या मुलांना खेळण्याचा लाभ घेता आलेला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही समस्येचे गांभीर्य पालिका प्रशासनाच्या निदर्शनास येत नाही. खेळणी दुरूस्तीच्या पाठपुराव्याची दखल घेतली जात नाही. पालिका प्रशासनाने महापालिका कार्यक्षेत्रातून नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावाला वगळले असल्यास येथील रहीवाशांना व ग्रामस्थांना महापालिका प्रशासनाने कल्पना द्यावी. येथील रहीवाशी व ग्रामस्थ महापालिका प्रशासनाचे करदाते नाहीत का? अडीच हजार कोटींच्या ठेवींचा आम्हा रहीवाशांनी व ग्रामस्थांनी अभिमान बाळगायचा का ? आमच्या उद्यानातील खेळणी लेखी पाठपुरावा करुनही दुरूस्त होत नाही म्हणून प्रशासनावर संताप व्यक्त करायचा, त्यांचे उत्तर द्यावे, अशी मागणी निवेदनातून महादेव पवार यांनी केली आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून उद्यानातील झोपाळे गायब झाले असून केवळ लोखंडी सांगाडा उद्यानात येणाऱ्या मुलांचे व रहीवाशांचे स्वागत करत आहे. लहान मुलांचे खेळण्याचा बदकही गायब झाला असून केवळ बदकाखालील लोखंडी गोलाकार चक्रीच शिल्लक आहे. सारसोळे गावातील आणि नेरूळ सेक्टर सहामधील मुलांना उद्यानात खेळण्यांशी खेळण्यांचा अधिकार नाही काय? आता लेखी पाठपुरावा करून आम्ही थकलो आहोत. आता या समस्येबाबत शेवटचे पत्र देत असून येत्या १० दिवसात म्हणजे १९ जुन २०२२ पर्यत उद्यानातील खेळण्यांची दुरूस्ती न झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस नेरूळ तालुकाच्या वतीने सोमवार, दि. २० जून २०२२ पासून ‘भीक मांगो’ उद्यानात येणाऱ्या रहीवाशांकडून तसेच सेक्टर सहामधील रहीवाशांकडून आणि सारसोळे ग्रामस्थांकडून घरोघरी जावून खेळण्यांच्या दुरुस्तीसाठी निधी गोळा करणार आहोत. पालिका प्रशासनाला खेळणी दुरूस्तीबाबतची त्यांची अकार्यक्षमता लपवायची असेल तर दिलेल्या १० दिवसाच्या मुदतीत खेळण्यांची दुरूस्ती करावी अन्यथा भीक मांगो आंदोलनातून पालिका प्रशासनाची बदनामी झाल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. १० दिवसांमध्ये खेळण्याची दुरूस्ती करा अथवा आमच्यासोबत निधी संकलनासाठी भीक मांगो आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन महादेव पवार यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना केले आहे.