अनंतकुमार गवई
नवी मुंबई : १ जून २०२० रोजी केंद्र सरकाने कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर “प्रधानमंत्री पथविक्रता आत्मनिर्भर निधी” योजनेची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली. त्याची अंमलबजावणी संपूर्ण राज्याप्रमाणेच नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये करण्यात येत असून या योजनेस जोडून केंद्र सरकारने “स्वनिधी से समृद्धी” या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित केलेले आहे.
त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या पात्र पथविक्रेत्यांनी यापूर्वी रुपये दहा हजार रक्कमेची यशस्वीपणे परतफेड केली आहे, अशा एकूण चार हजार ६७६ पात्र पथविक्रेत्यांचे सामाजिक, आर्थिक प्रोफाईल आपल्या जवळच्या विभाग कार्यालयात जाऊन माहिती सादर करणे आवश्यक आहे.
तरी अशा पात्र पथविक्रेत्यांनी आपली नोंदणी जवळच्या महानगरपालिका विभाग कार्यालयात जाऊन करून घ्यावी. पात्र लाभार्थ्यांनी सोबत कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आधारकार्ड, रेशनकार्ड व रुपये दहा हजार रक्कमेच्या कर्जाकरिता रजिस्टर्ड केलेला मोबाईल सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे असे महापालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.