नवी मुंबई : सानपाडा नोडमधील प्रभाग ३० मधील रहीवाशांच्या जनजागृतीसाठी आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोजन करण्याची लेखी मागणी भाजपचे युवा नेते व समाजसेवक पांडुरंग आमले यांनी एका निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
प्रभाग ३० मध्ये सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर १२,२,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १५,१६, १६ ए,१७, १८, १९,२०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसराचा समावेश होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. या दिवसांमध्ये मलेरिया, ताप, हिवताप, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आदी साथीच्या आजारांचा प्रभाग ३० मधील परिसरात उद्रेक होवून रुग्ण वाढीची संख्या पहावयास मिळते. त्यातच आता गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचेही प्रमाण वाढीस लागले आहे. जवळच्या मुंबई शहरात ओमायक्रॉनचे चार रूग्ण दोन दिवसापूर्वीच आढळले होते. या पार्श्वभूमीवर प्रभाग ३० मधील गृहनिर्माण सोसायट्यांतील रहिवाशांनी आजार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी, आजार झाल्यावर काय करावे, आजाराची लक्षणे काय आहेत, आजार अंगावर काढल्याने कितपत हानी होते. आजाराची साथ कशामुळे निर्माण होते. साथीचे आजार, कोरोना, ओमायक्रॉन या आजारांचा सामना कसा करावा, याबाबत प्रभाग ३० मधील रहीवाशांना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. प्रभाग ३० मध्ये महापालिकेचे पूर्वीचे तीन प्रभाग समाविष्ट झाले असल्याने प्रभाग ३० मध्ये तीन ठिकाणी तीन दिवस मार्गदर्शनपर आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.