अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनातील रिक्त पदावर प्रशासनातील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची लेखी मागणी कामगार नेते व नवी मुंबई अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात रविंद्र सावंत पुढे म्हणाले की, सद्य:स्थितीत संदर्भ क्र. १ नुसार नवी मुंबई महानगरपालिकेत मंजूर असलेल्या अतिरिक्त आयुक्त संवर्गातील दोनपैकी १ पद , उप आयुक्त संवर्गातील १० पैकी पाच पदे आणि सहाय्यक आयुक्त संवर्गातील २४ पैकी १२ पदे ही नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी यांतून पदोन्नतीने / नामनिर्देशनाने भरावयाची पदे आहेत. परंतु ह्या पदांपैकी अतिरिक्त आयुक्त संवर्गातील दोन्ही पदे प्रतिनियुक्तीमार्फत भरण्यात आलेली आहेत. व उप आयुक्त संवर्गातील पाचपैकी केवळ तीन पदे नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांतून भरण्यात आलेली आहेत. ह्याबरोबरच सहाय्यक आयुक्त संवर्गातील अनेक पदे रिक्त असून त्यावर सुद्धा प्रतिनियुक्तीचे मुख्याधिकारी संवर्गातील अधिकारी नियुक्त आहेत. हा नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी अधिकारी यांच्यावर अन्याय असून स्थानिक प्रश्नांची जाण व माहिती नसणाऱ्या प्रतिनियुक्तीच्या अधिकाऱ्यांच्या हाती पालिका आंदण दिल्याचे विदारक चित्र उभे राहीले आहे.
तिरिक्त आयुक्त पदावरील नमुमपाच्या कोट्यातील पद हे नमुमपा अधिकाऱ्यांतून भरावे. जर पदोन्नतीच्या प्रक्रियेस विलंब लागत असेल तर सुयोग्य नमुमपा अधिकाऱ्याकडे अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार विनाविलंब सुपूर्द करावा. उप आयुक्त संवर्गातील नमुमपाच्या कोट्यातील पाचहे पदे नमुमपा अधिकाऱ्यांतूनच भरावी. रिक्त असलेल्या दोन जागांवर नमुमपाच्या समकक्ष वेतनश्रेणीतील तांत्रिक अधिकाऱ्यांकडे उप आयुक्त पदाचा विनाविलंब कार्यभार सुपूर्द करावा. याच धर्तीवर सहाय्यक आयुक्त संवर्गातील रिक्त पदांवर नमुमपा कर्मचाऱ्यांची पदोन्नती/ नामनिर्देशन किंवा कार्यभार देवून नियुक्ती करावी. बराच काळ प्रलंबित असलेल्या नमुमपाच्या जिव्हाळ्याच्या विषयावर त्वरित निर्णय घेवून नियुक्त्या कराव्यात आणि नमुमच्या कोट्यातील जागेवर प्रतिनियुक्तीने पदस्थापनेसाठी आलेल्या उप आयुक्तांना विनाविलंब कार्यमुक्त करावे किंवा नमुमपा कोट्यातील पदावर नियुक्ती देवू नये अन्यथा इंटकमार्फत प्रखर आंदोलन उभे केले जाईल असा इशारा कामगार नेते रविंद्र सावंत यांनी इशारा दिला आहे.