नवी मुंबई : सानपाडा नोडमधील प्रभाग ३० येथील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर १२,२,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १५,१६, १६ ए,१७, १८, १९,२०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरात होणाऱ्या दूषित पाण्याच्या समस्येचे निवारण करण्याची लेखी मागणी समाजसेवक व सानपाडा नोडमधील भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सानपाडा नोडमधील प्रभाग ३० मध्ये सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर १२,२,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १५,१६, १६ ए,१७, १८, १९,२०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसराचा समावेश होत आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडून दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. लालसर तांबूस रंगाचे पाणी येत आहे. स्थानिक रहीवाशांनी याबाबत आमच्या कार्यालयात तक्रारीही केल्या आहेत. पाणीही आणून दाखविले आहे. रहीवाशांना पाणी उकळून व गाळून घ्यावे लागत आहे. पण चार-पाच दिवसापासून दूषित पाण्यामुळे रहीवाशी आजारी पडण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे सानपाडा नोडमधील प्रभाग ३० मध्ये दूषित पाण्यामुळे जनसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळा अजून सुरूही झालेला नाही. जवळपास सव्वा महिन्यापासून दूषित पाणी येत आहे. त्यामुळे दूषित पाणी का येत आहे, याचे महापालिका प्रशासनाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे स्पष्टीकरण होणे आवश्यक आहे. दूषित पाण्याची समस्या संपुष्टात आणावी. सानपाडा नोडमधील प्रभाग ३० मधील रहीवाशांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.