अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवीन पुनर्रचनेतील महापालिका प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे व कुकशेत गावात महापालिकेकडून होणाऱ्या दूषित पाण्याच्या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची लेखी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका व महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर सहा, आठ, दहा आणि साररसोळे गाव, कुकशेत गाव या परिसराचा समावेश होत आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडून दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. लालसर तांबूस रंगाचे पाणी येत आहे. स्थानिक रहीवाशांनी व ग्रामस्थांनी याबाबत आमच्या कार्यालयात तक्रारीही केल्या आहेत. पाणीही आणून दाखविले आहे. रहीवाशांना व ग्रामस्थांना पाणी उकळून व गाळून घ्यावे लागत आहे. पण चार-पाच दिवसापासून दूषित पाण्यामुळे रहीवाशी व ग्रामस्थ आजारी पडण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे प्रभाग ३४ मध्ये दूषित पाण्यामुळे जनसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळा अजून सुरूही झालेला नाही. जवळपास सव्वा महिन्यापासून दूषित पाणी येत आहे. त्यामुळे दूषित पाणी का येत आहे, याचे महापालिका प्रशासनाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे स्पष्टीकरण होणे आवश्यक आहे. दूषित पाण्याची समस्या संपुष्टात आणावी. प्रभाग ३४ मधील रहीवाशांना व ग्रामस्थांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.