नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ८ मधील प्लॉट ५० वरील सह्याद्री सोसायटीची पाण्याची समस्या सोडवून स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी सानपाडा नोडमधील भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सानपाडा सेक्टर ८ मधील प्लॉट ५० वर असलेल्या सह्याद्री को.ऑप. हौसिंग सोसायटीच्या रहीवाशांना भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येबाबत या निवेदनातून लक्ष वेधण्याचा व समस्येचे गांभीर्य पालिाक आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न पांडुरंग आमले यांनी केला आहे.
या सोसायटीमध्ये डी-११ ते डी-२० अशा १० इमारती असून १६० सदनिका आहेत. जवळपास ५२५ हून अधिक रहीवाशांचे (महिला, पुरूष, मुले, ज्येष्ठ नागरिक) येथे वास्तव्य आहे. गेल्या काही महिन्यापासून या सोसायटीला कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने येथील रहीवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पाणीटंचाईबाबत येथील रहीशांनी लेखी तक्रारी, फोनवर संपर्क साधून, व्हॉटसअपवर समस्या मांडून पालिका प्रशासनाकडे आपली व्यथा सातत्याने मांडलेली आहे. परंतु पालिका प्रशासनाने या रहीवाशांना भेडसावणाऱ्या समस्येकडे काणाडोळाच केलेला आहे. येथील करदात्या रहीवाशांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असून त्यांनी समस्या मांडूनही पालिका प्रशासन दखल घेत नाही, ही खरोखरीच शोकांतिका आहे. आपण स्वत: या ठिकाणी भेट देवून रहीवाशांशी चर्चा केल्यास आपल्याही निदर्शनास समस्येचे गांभीर्य येईल. दररोज १५० युनिट पाण्याची या सोसायटीला गरज आहे. ते पाण्याचे देयकही महापालिका प्रशासनाला तयार आहेत. मग पालिका प्रशासनाला येथील रहीवाशांना पाणी देण्यास काय हरकत आहे? या सोसायटीतील रहीवाशांनी पालिकेच्या पाईपलाईनला अनधिकृत जोडणी करावी अशी पालिका प्रशासनाची इच्छा आहे काय? समस्या गंभीर आहे. कमी पाणीदाबाने रहीवाशी त्रस्त झाले आहेत. आपण स्वत: येवून पाहणी करावी अथवा संबंधितांना येथील पाणी समस्येचे निवारण करण्याचे निर्देश देण्याची मागणी समाजसेवक पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
या सोसायटीतील रहीवाशांना होत असलेला कमी दाबाचा व पूर्वीच्या तुलनेत आता कमी होत असलेला पाणीपुरवठा पाहता स्वमालकीचे मोरबे धरण असतानाही रहीवाशी पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. या रहीवाशांना सध्या ८० मिमि व्यासाच्या पाईपलाईनमधून पाणी येत असून ते पाणी रहीवाशांना कमी पडत आहे. पालिका प्रशासनाच्या उपअभियंत्यांनी या सोसायटीत ६ जून २०२२ रोजी येवून पाहणीही केलेली आहे. पाणी कमी पडत असल्याने १२० मिमि व्यासाच्या पाईपलाईनमधीप पाण्याची आवश्यकता आहे. येथील रहीवाशांनी याविषयीही पालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा केलेला आहे. आपण स्थानिक रहीवाशांकडून होत असलेली दैनंदिन १५० युनिट पाण्याची व १२० मिमि व्यासाच्या पाईपलाईनमधील पाणीपुरवठ्याविषयीच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी संबंधितांना निर्देश देवून लवकरात लवकर रहीवाशांना दिलासा देण्याचे काम करावे,अशी मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.