अनंतकुमार गवई :
नवी मुंबई : नेरूळ नोडमधील नवीन पुनर्रचनेतील प्रभाग ३४ मध्ये साथीच्या आजारांचा उद्रेक होवू नये यासाठी तातडीने धुरीकरण अभियान राबविण्याची मागणी महापालिकेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती तसेच प्रभाग ८५च्या माजी भाजप नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी एका लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
महापालिका प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर सहा, आठ, दहा आणि साररसोळे गाव, कुकशेत गाव या परिसराचा समावेश होत आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून डासांचा उपद्रव वाढीस लागला आहे. सांयकाळी ६ नंतर नेरूळ सेक्टर सहा, आठ, दहामधील रहीवाशांना आणि सारसोळे व कुकशेत गावच्या ग्रामस्थांना रहीवाशांना दारे-खिडक्या बंद करावी लागतात. डासांमुळे रहीवाशी त्रस्त झाले आहेत. मलेरिया, डेंग्यू या साथीच्या आजाराचा परिसरात उद्रेक होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रभाग ३४ मध्ये पालिका प्रशासनाने व्यापक प्रमाणावर धुरीकरण अभियान राबवून रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी सौ . सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.