माजी नगरसेवक सुरज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
नवी मुंबई नेरुळ : सारसोळे येथे नवी मुंबई महापालिकेची सिबीएससी शाळा चालू शैक्षणिक वर्षात सुरू करण्यास नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी हिरवा कंदील दिला आहे. आता नेरुळमधील सिबीएससी बोर्डाच्या शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या , गरजू मुलांना निशुल्क आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार असल्याने सारसोळे, नेरुळ परीसरातील पालकांनी आनंद व्यक्त केला आहे . नवी मुंबईतील कुकशेत गावामध्ये २०१२ साली इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करून नेरुळमधील मध्यवर्ती असलेल्या सारसोळे ठिकाणी आता सिबीएससी हायस्कूल सुरू करून माजी नगरसेवक सुरज पाटील यांनी गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजीतुन गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण क्षेत्रात केलेला भगीरथ प्रयत्न यशस्वी झाला आहे. सन २०२२-२३ या चालू शैक्षणिक वर्षात सारसोळे, नेरुळ मध्ये सिबीएससी शाळा सुरू करण्यास त्वरित मान्यता दिल्याने सुरज पाटील यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे आभार मानले आहेत.
स्थानिक माजी नगरसेवक सुरज पाटील यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघातील कुकशेतमध्ये पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा २०१२ मध्ये सुरू करून गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजीतून शिक्षण घेण्याची प्रवेशद्वार खुली करून दिली. आता चालू शैक्षणिक वर्षात नेरुळ क्षेत्र २ मधील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सारसोळे, नेरुळमध्ये सिबीएससी शाळा सुरू होणार आहे .त्यामुळे भरमसाठ देणग्या आणि शैक्षणिक फी वसूल करणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थांत आपल्या मुलांना शिक्षण देऊ न शकणाऱ्या पालकांना आता आपल्या मुलांना सिबीएससी शाळांत निशुल्क आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे .
वी मुंबई महापालिका सिबीएससी शाळा एफएसएमपीटी तत्वावर खाजगी संस्थेमार्फत चालवणार आहे. यासाठी नवी मुंबई मनपा शाळेच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वेतनापोटी येणाऱ्या एकूण खर्चापेकी ५५ टक्के खर्चाचा हिस्सा संबंधित संस्थेस देणार आहे तर उर्वरित ४५ टक्के खर्च संस्था स्वतः करणार आहे. नेरुळमधील नवी मुंबई महापालिका प्राथमिक शाळा क्र १२ सेक्टर ६ सारसोळे यासोबत त्याच ठिकाणी नवीन सिबीएससी बोर्डाची शाळा क्र ९८ नर्सरी ते इयत्ता १० पर्यंत निविदा प्रक्रिया पुर्ण करुन चालू शैक्षणिक वर्षांपासून सुरू होणार आहे. सदर ठिकाण नेरुळ क्षेत्र २ आणि ३ मधील मध्यवर्ती असून सारसोळे गाव, नेरुळ सेक्टर ६, ८, १०, १४, १६, १६अे , १८, १८ अे, २,४, २० ,२२, २४ , कुकशेत गाव, नेरुळ गाव या ठिकाणी राहण्यास असणाऱ्या पालकांना आपल्या पाल्यास शाळेत घालणे सुलभ होणार आहे.
माजी नगरसेवक सुरज पाटील यांनी आपल्या प्रभागातील गटर , मीटर आणि वॉटर याच्या पलीकडे जाऊन नवी मुंबई मनपा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून लोकनेते गणेश नाईक यांच्या माध्यमातून २०१२ साली बेलापूर विधानसभा मतदारसंघात मनपाची पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा गोरगरिबांच्या मुलांसाठी सुरू करून आपली शिक्षण क्षेत्रातील आवड दाखवून दिली होती. सारसोळे गावातील ग्रामस्थांचा विश्वास प्राप्त करून सिबीएससी माध्यमाची शाळा मनपाकडे सातत्याने पाठपुरावा करत मंजूर करून घेतली आणि भगीरथ प्रयत्न करून शिक्षणाची ज्ञानगंगा सर्वसामान्यांच्या घरी पोहचवली. ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून आयुक्त अभिजीय बांगर यांच्याकडे सारसोळे नेरुळ येथे सिबीएससी शाळा सुरू करण्यास माजी नगरसेवक सुरज पाटील यांच्या प्रयत्नास यश आले आहे .