गणेश पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका आरोग्य विभागात सुरू असलेल्या अनागोंदी व मनमानी स्वरूपातील कारभाराबाबतचे वाभाडे मनसेच्या वतीने नवी मुंबई आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून काढण्यात आले आहे. या निवेदनात मनसेमार्फत प्रमुख तीन मागण्यांचे पत्र आयुक्तांना देण्यात आले. यामध्ये कोविड कालावधी मध्ये घणसोली येथील सेक्टर ७ च्या शाळेमध्ये मनपाच्या वतीने कोविड केअर सेंटरच्या निर्मितीकरिता लाखों रुपयांचा निधी खर्च करूनही एकाही रुग्णाने याठिकाणी उपचार घेतलेले नाहीत. त्याचबरोबर या ठिकाणी आता शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्यामुळे संबंधित कोविड केअर सेंटरसाठी लागणारे साहित्य सद्य:स्थितीत कुठे आहे, याची माहिती देण्यास संबंधित पालिका अधिकारी टाळटाळ करत असल्याची बाब आयुक्तांच्या लक्षात आणून दिली व याबाबत सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर उचित कारवाई करण्याची मागणी केली असल्याची माहिती मनसे रस्ते आस्थापना विभागाचे नवी मुंबई शहर संघटक संदीप गलुगडे यांनी दिली.
मनसेने मनपामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून महापालिका भरतीचे सर्व नियम धाब्यावर बसवून दंत चिकित्सक पदवीधारक डॉक्टर अजय गडदे यांना पदभार दिला असल्याचे महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले, महापालिका भरती नियमाप्रमाणे एम.बी.बी.एस डॉक्टर यांच्याकडे वैद्यकीय अधिकारी म्हणून पदभार असणे आवश्यक असते. त्याचबरोबर नवी मुंबई महापालिकेत ३० ते ४० एम. बी. बी. एस. डॉक्टर उपलब्ध असताना दंत चिकित्सक डॉक्टर यांच्याकडे सदर पदाचा महापालिका कसा देवू शकते, असा सवाल मनसेने यावेळी उपस्थित केला. सर्वात महत्वाचे म्हणजे कोविड कालावधीमध्ये संबंधित अधिकारी यांच्याकडेच हा पदभार होता, असे संदीप गलुगडे यांनी आयुक्तांच्या लक्षात आणून दिले. संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ वैद्यकीय अधिकारी या पदावरून मुक्त करण्याची मागणी संदीप गलुगडे यांनी यावेळी केली.
मनसेने ऐरोली येथील रुग्णालयात आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी म्हणून मनपा आरोग्य विभागात रुजू झालेले डॉ. गजानन मिटके यांनी अजूनपर्यंत त्यांचा पदभार न स्वीकारता ते महापालिका मुख्यालयातच बसून आपले कामकाज करत असल्याचे महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देताना आपला संताप व्यक्त केला. त्यांनी त्यांचा पदभार तात्काळ स्विकारण्याबाबत आपण त्यांना आदेशीत करावे असे निवेदन मनपाच्या आयुक्तांना देण्यात आले.
यावेळी नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी मनसेच्या शिष्टमंडळाकडून संबंधित सर्व प्रकरणाची माहिती घेवून पंधरा दिवसांत लेखी उत्तर देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी मनसेच्या शिष्टमंडळात मनसे रस्ते आस्थापना विभागाचे नवी मुंबई शहर संघटक संदीप गलुगडे, घणसोली मनसे विभाग अध्यक्ष विशाल चव्हाण, शाखा अध्यक्ष निलेश जाधव, उपप्रभाग संघटक धनंजय देवकर, महाराष्ट्रसैनिक आशिष चोरगे उपस्थित होते.