नवी मुंबई : महापालिका परिवहन उपक्रमातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता देण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त व परिवहन व्यवस्थापकांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
कोरोना महामारीच्या काळात महापालिका प्रशासनामध्ये कार्यरत असणारे सर्वच संवर्गातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी केलेले कार्य प्रशंसनीय आहे. कोरोना महामारीमध्ये नवी मुंबईकरांची सेवा करताना त्यांनी स्वत:च्या आणि स्वत:च्या जिविताची पर्वा केलेली नाही. या कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाकडून दैनंदिन कोव्हिड भत्ताही देण्यात आला आहे. परंतु महापालिका परिवहन उपक्रमामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी संवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांना आजतागायत कोव्हिड भत्ता देण्यात आलेला नाही. कोरोना महामारीच्या काळात परिवहन उपक्रमाच्या बसेसचे रूग्णवाहिकेमध्ये रूपांतर करण्यात आले होते. या बसेसची दररोज सफाई करणे, धुणे, स्वच्छता ठेवणे आदी कामे या सफाई कर्मचाऱ्यांना करावी लागत होती. काम करूनही या कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता मिळालेला नाही. या समस्या निवारणासाठी आपणाकडे अनेकदा लेखी निवेदनातून तसेच प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा केलेला आहे. आश्वासनाशिवाय आजवर पदरात काहीच पडलेले नाही. समस्येचे गांभीर्य पाहता परिवहन उपक्रमातील कंत्राटी संवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर कोव्हिड भत्ता देण्याचे निर्देश देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी केली आहे.