नवी मुंबई : नेरूळ सेक्टर दोन, चार व जुईनगर नोडमध्ये पालिका प्रशासनाकडून होत असलेला दूषित व गढूळ पाणीपुरवठा येत असल्याने या समस्येचे निवारण करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
गेल्या सव्वा ते दीड महिन्यापासून नवी मुंबईत तसेच मोरबे धरण परिसरात संततधार स्वरूपात परंतु मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून नेरूळ सेक्टर २, ४ आणि संपूर्ण जुईनगर नोडमध्ये दूषित तसेच कधी तांबूस तर कधी गढूळ तर कधी दुसऱ्या रंगाचे पाणी येत आहे. पावसामुळे माचूळ, गढूळ पाणी येवू लागल्याने रहीवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रहीवाशांना पाणी गाळून व उकळून प्यावे लागत आहे. दूषित पाण्यामुळे रहीवाशांना पोटाचे विशेषत: अपचनाचे आजार जडले आहे. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार वाढण्याची भीतीही स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मोरबे धरण परिसरात पाऊस पडत असल्याने गाळाचे अथवा मातीचे पाणी सुरूवातीला येणे एकवेळ समजण्यासारखे आहे. तथापि गेली सव्वा ते दीड महिना दूषित व गढूळ पाणी येत असल्याने स्थानिक पाणीपुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखे आहे. स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्तव्य आहे. दूषित व गढूळ पाण्यामुळे जिवितहानी होवू नये यासाठी तात्काळ या समस्येचे निवारण करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.