शैलेंद्र शिर्के : Navimumbailive.com@gmail.com – ९८२००९६५७३
नवी मुंबई :जुईनगर सेक्टर २४ परिसराला बकालपणा व रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार असणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला समज देण्याची तसेच आर्थिक दंड ठोठावण्याची लेखी मागणी नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
जुईनगर हा पूर्णपणे निवासी वस्तीचा परिसर असून हा पूर्णपणे सिडको वसाहतीचा विभाग आहे. या ठिकाणी माता अमृतानंदमयी शाळेच्या समोरच जुईनगर सेक्टर २४, प्लॉट क्रं १६ए या ठिकाणी एका प्रियंका रेजन्सी नामक बांधकाम व्यावसायिकांने प्रियंका पॅराडाइज नावाच्या गृहप्रकल्पाचे काम सुरु केले आहे. या गृहप्रकल्पाच्या बांधकामामध्ये बिल्डरकडून निर्देशाचे पालन होत नसल्याने धुळीच्या उद्रेकांच्या स्थानिक रहीवाशांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना त्रास सुरू झाला असून तेथील परिसरालाही बकालपणा येवू लागला आहे. या ठिकाणी येणाऱ्या रेती, सिमेंटच्या ट्रकमुळे धुराळा वाढू लागला आहे. शिवाय रस्त्यावरून बांधकाम साहित्य घेवून गेल्यावर तेथील सफाई करणे हे संबंधित बिल्डरचे काम असते. परंतु या ठिकाणी रस्त्याची सफाईही बिल्डरकडून केली जात नाही. येथील रस्त्यांवर चिखल, माती पसरली असून लोकांना ये-जा करण्यास तसेच वाहने नेण्यासही त्रास सहन करावा लागत आहे. या जुईनगरमधील पश्चिमेच्या बाजूकडील मुख्य रस्ता असून येथे वाहनांची व पादचाऱ्यांची वर्दळ सतत मोठ्या प्रमाणावर असते. त्यातच ही बांधकामाची वाहने आल्यावर वाहतुक कोंडीही बराच वेळ होते. आताच येथील रस्त्याचे नव्याने काम व डागडूजी करण्यात आलेली आहे. या कामासाठीच्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्याची दुरावस्था होवू लागली आहे. त्यामुळे संबंधित बिल्डरकडून रस्त्याचा खर्च वसूल करण्यात यावा आणि धुळीच्या त्रासापासून स्थानिक रहीवाशांची मुक्तता करण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.