जीवन गव्हाणे : स्वयंम न्युज ब्युरो : ९८२००९६५७३
नवी मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही ‘स्वराज्य महोत्सव’ आणि ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम या माध्यमातून विविध विभागांमार्फत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम राबविले जात आहेत.
या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांच्या नियंत्रणाखाली १३ ऑगस्ट रोजी बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रात तेथील ६०० हून अधिक महिला बचत गटांनी भव्यतम रॅलीव्दारे ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार केला.
या रॅलींमध्ये प्रत्येक विभाग कार्यालयाच्या क्षेत्रातील किमान ७५ वा त्यापेक्षा अधिक महिला बचत गटांनी उत्साही सहभाग घेतला. प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रात या रॅलीमध्ये पाचशे ते दीड हजारहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. देशभक्तीने प्रेरित होऊन जय हिंद, वंदे मातरम्, भारत माता की जय, जय जवान जय किसान अशा विविध प्रकारच्या देशभक्तीपर घोषणा देत या ७५०० हून अधिक महिलांनी संपूर्ण नवी मुंबई परिसर निनादून टाकला.
या महिला बचत गटांमार्फत ७५ हजारहून अधिक झेंड्यांची निर्मिती करण्यात आली. त्याचप्रमाणे हे झेंडे त्यांच्यामार्फत नागरिकांपर्यंत विविध माध्यमांतून पोहोचविण्यातही आले. या स्वतः: निर्मिलेल्या झेंड्यांचे प्रदर्शन त्यांनी रॅलीमध्ये केले. पावसाळी वातावरण असूनही या रॅलीमध्ये अतिशय उत्साहाने सहभागी होत महिलांनी राष्ट्रभक्तीचे दर्शन घडविले.