विलास चव्हाण : ९८२००९६५७३ : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई (प्रतिनिधी): देशाला प्रगतीपथावर नेण्याचे, आत्मनिर्भर करण्याचे स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपणाला परिश्रम करायचे आहे, प्रगती करायची आहे. देशाला प्रगतीपथावर नेवून गरीबी हटवायची आहे, उद्योग वाढवायचे आहेत, त्यासाठी देशाची निर्यात व दरडोई उत्पन्न वाढवायचे आहे. त्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. उद्योजक व सीए लोकांनी सहकार्य करावे. नियोजनाला परिश्रमाची सांगड घालून विकास साधल्यास आपला देश लवकरच आत्मनिर्भर झाल्याचे पहावयास मिळेल, असा विश्वास केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी ‘आझादी का अमृत महोत्सवा’ निमित्त इंडियन मर्चंट चेंबर आणि ‘दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एमएसएमई’ यात्रा कार्यक्रमाला हिरवा झेंडा दाखवला, त्यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना देश आत्मनिर्भर करण्यासाठी कराव्या लागणारे प्रयत्न, नियोजन व दरडोई उत्पन्न वाढविण्याचे ध्येय याबाबत मार्गदर्शन करत होते.
भारताला आत्मनिर्भर करण्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जण कार्यरत आहे. देशात मायक्रो, स्मॉल, मिडियम उद्योग वाढले पाहिजे. कृषी व इतर विभागातही उद्योगाचे व रोजगाराचे प्रमाण वाढले पाहिजे यासाठी जे नियोजन व कार्य सुरू आहे, त्यामुळे देशात लवकरच रोजगार वाढणार, उद्योगामुळे देशाच्या उत्पन्नात वाढ होणार, दरडोई उत्पन्नातही वाढ होवून जीडीपीही वाढेल, आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने आपण वाटचाल करू लागलो आहोत, या सर्वांचे श्रेय पंतप्रधान मोदी यांचे असल्याचे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.
मुंबईतून आपण राजकारणाचा श्रीगणेशा गिरविला. बेस्ट समिती, नगरसेवक, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रीपदापर्यत पोहोचलो. १९९०च्या सुमारास बाळासाहेब ठाकरे यांनी मला कोकणसाठी काम करण्यास सांगितल्यावर मी सिंधुदुर्गात गेलो, त्यावेळी तेथील लोकांचे दरडोई उत्पन्न त्यावेळी केवळ ३५ हजार रूपये होते. मी येथील परिस्थिती बदलण्यासाठी रोजगार, विकास, दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी टाटा कंपनीला येथील अभ्यास करुन अहवाल सादर करण्यास सांगितले. त्यांनी सहा महिन्यानंतर अहवाल दिला. सिंधुदुर्गचा सागर, गोव्यानजिकचे वास्तव्य सर्व विचार करून विकासासाठी योजना मांडल्या, त्यावर आम्ही काम केले. रोजगार वाढला, उद्योग वाढले. आता तेथील दरडोई उत्पन्न सव्वा दोन लाख रुपये आहे. नियोजनाला परिश्रमाची सांगड घातल्याने आज सिंधुदुर्गच्या विकासाचे चित्र बदलत असल्याचे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येक क्षेत्रात एमएसएमई जाणार असून उद्योगांना मदत करणार आहे. तुम्ही सर्व सोबत आहात, तुमच्यामुळे इतरांना प्रेरणा मिळेल. रोजगार वाढेल. आज एक्सपोर्टचा हिस्सा केवळ ४६ टक्के आहे, तो ६० टक्क्यांपर्यत नेण्याचेआम्ही वचन दिले आहे. आज परदेशात शिक्षण घेवून युवक देशात अत्याधुनिक तंत्रज्ञान घेवून येत आहेत. व्यवसाय करण्यास ते उत्सूक आहेत. त्यांना सहकार्य करण्यासाठी सरकारकडून योजना बनविण्यात आली आहे. मायक्रो, मध्यम, छोटे उद्योग करण्यासाठी त्यांना सर्व मदत करणार आहोत. बॅंकांच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करून त्यांच्या अडचणींचे निवारण करणार. बॅकेने कर्ज उपलब्ध करुन दिले पाहिजे यासाठी अर्थमंत्र्यांशी बैठक घेवून चर्चा करणार असून युवकांना सुविधा, पैसा उपलब्ध झाला पाहिजे. सर्वांनी त्यांना सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन नारायण राणे यावेळी उपस्थितांना केले.
मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. देशाचा विकास करण्यासाठी, बेरोजगारी व गरीबी हटविण्यासाठी सर्वांनी संघठीत काम केले पाहिजे. उद्योगांबाबत एकत्रित कार्य केल्यास निकाल नक्कीच मिळेल. लोकांना रोजगार मिळाल्यास उत्पन्न वाढेल. निर्यात वाढेल, अनेक संकल्प आहेत. समस्या सोडविण्याची तयारीआहे. शहरी भागासोबत ग्रामीण भागातही रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याचे प्रयत्न सुरू आहे. कृषी क्षेत्रासाठी उद्योजकांनी पुढे आले पाहिजेत. सरकारकडून ३५ ते ९० टक्के सबशिडी ग्रामीण भागातील उद्योगांसाठी दिली जात आहे. शहरी व ग्रामीण भागासाठी एकत्रित कार्य झाल्यास येत्या काळात आपला देश नक्कीच आत्मनिर्भर झालेला व महासत्तेच्या दिशेने वाटचाल करताना जगाला पहावयास मिळेल, असा आशावाद नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केला.
आज मोदींजीच्या रूपाने नेतृत्व विकासाच्या घोषणा करत आहे, त्यासाठी प्रयत्न करत आहे. आज देशाला ७५ वर्षात आत्मनिर्भर बनता आले नाही. परंतु आज ज्या पध्दतीने काम सुरू आहे, ते पाहता आगामी २५ वर्षात देश नक्कीच आत्मनिर्भर बनेल, त्यासाठी बेरोजगारी घटविण्यावर व उत्पन्न वाढविण्यावर भर देत असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली.