नवी मुंबई : शिंदे गटातील कार्यकर्त्यांकडून तुर्भे झोपडपट्टी भागातील शिवसेनेच्या शाखांवर बेकायदेशीर ताबा घेऊन शाखांवर टाळे लावल्याबाबत ठाकरे गटाच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पोलीस उपायुक्त मेंगडे, उपायुक्त पानसरे यांची भेट घेऊन संबंधित विषयात न्याय देणेबाबत लेखी निवेदन दिले.
दोन्ही पोलीस उपयुक्तांनी कायदा सुव्यवस्था बिघडू देणार नाही. असे आश्वासन दिले. संबंधित शाखा नेमकी कोणाची आहे. याबाबत चौकशी करू. असे उत्तर ठाकरे गटाच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांना दिले.
तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील शाखा क्रमांक एक तुर्भे स्टोअर, शाखा क्रमांक दोन गणेश नगर, शाखा क्रमांक तीन मच्छी मार्केट आंबेडकर नगर, शाखा क्रमांक चार गणपती पाडा या चार शाखा शिवसेना शाखा म्हणून कार्यरत आहेत. या शाखेत त्या – त्या भागातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक अनेक वर्षापासून शिवसेना शाखेच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्याचा काम करीत आहेत. या शाखेच्या माध्यमातून जनसेवेचे काम गेल्या ३०-३५ वर्षापासून सुरू आहे. मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटी नंतर या कार्यरत असलेल्या शाखा रात्री बंद केल्यानंतर शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांनी आम्ही लावलेल्या टाळ्यावर टाळे लावून शिवसेना शाखा बंद केलेल्या आहेत. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये खूप मोठी नाराजी निर्माण झाली असून आम्ही कायद्याचे पालन करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत, संबंधित विषयात सहकार्य करून न्याय द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, दिलीप घोडेकर, संतोष घोसाळकर, संदिप पाटील, शहरप्रमुख विजय माने, उपशहर प्रमुख महेश कोटीवाले, विनोद मुके, उपविभाग प्रमुख अशोक विघ्ने, किशोर लोंढे, शिवसेना शाखाप्रमुख अशोक भामरे, सिध्दाराम शिलवंत, प्रविण पाटील, दत्तात्रय दिवाणे तसेच शिवसैनिक उपस्थित होते.