नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांची व सारसोळे ग्रामस्थांची अंगाला खाज येणाऱ्या किड्यांपासून मुक्तता करण्यासाठी समस्येचे निवारण होईपर्यत औषधफवारणी करण्याची लेखी मागणी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती व प्रभाग ८५च्या माजी नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकरांकडे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहामधील साडे बारा टक्के भुखंडावरील प्लॉट २३२ वरील रुबी अपार्टमेंट ते रेड रोझ नर्सरी, सिडको सोसायट्या तसेच सारसोळे गाव, दर्शन दरबार मागील व सभोवतालच्या गृहनिर्माण सोसायटीतील रहीवाशांची अंगाला खाज पसरविणाऱ्या किड्यांच्या त्रासापासून मुक्तता करण्यासाठी तात्काळ औषधफवारणी करणे आवश्यक असल्याचे माजी सभापती सुजाता सुरज पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
सध्या नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावामध्ये अंगाला खाज पसरविणाऱ्या किड्यांचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला आहे. नेरूळ सेक्टर सहामधील साडे बारा टक्के भुखंडावरील प्लॉट २३२ वरील रुबी अपार्टमेंट ते रेड रोझ नर्सरी, सिडको सोसायट्या तसेच सारसोळे गाव, दर्शन दरबार मागील व सभोवतालच्या गृहनिर्माण सोसायटीतील रहीवाशी या किड्यांमुळे त्रस्त झाले आहेत. सध्या दिवाळी सुरू आहे. घरी पाहूणे मंडळी सणानिमित्त आली असल्याने या किड्यामुळे स्थानिकांनाच नाही तर पाहूण्यांनाही त्रास झाला आहे. हे किडे चावल्यावर अंगाला खाज सुटत असल्याचे रहीवाशांचे व ग्रामस्थांचे म्हणणे आहे. समस्येचे गांभीर्य पाहता नेरूळ सेक्टर सहामधील साडेबारा टक्केमधील तसेच सिडको वसाहतीमधील रहीवाशांची आणि सारसोळे ग्रामस्थांची अंगाला खाज येणाऱ्या किड्यापासून मुक्तता करण्यासाठी आपण पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाला या ठिकाणी समस्येचे निवारण होईपर्यत सातत्याने औषध फवारणी करण्याचे निर्देश देण्याची मागणी माजी सभापती सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.