नवी मुंबई : सानपाडा नोडमधील प्रभाग ३० मध्ये गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात तसेच पालिका उद्यानात धुरीकरण अभियान राबविण्याची लेखी मागणी सानपाडा नोडमधील भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
सानपाडा नोडमधील प्रभाग ३० मध्ये सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरात अंर्तगत व बाह्य परिसरात तसेच संबंधित भागातील गृहनिर्माण सोसायट्यांचा समावेश होत आहे. प्रभाग ३० मध्ये गेल्या काही दिवसांपासून डासांच्या उपद्रवाने स्थानिक रहिवाशी त्रस्त झाले आहेत. डासांमुळे रहीवाशांना सांयकाळनंतर सोसायटी आवारात वावरता येत नाही. दारे-खिडक्या बंद ठेवून घरात बसावे लागत आहे. डासांमुळे बाराही महिने या प्रभागात साथीच्या आजाराने ग्रस्त रुग्ण पहावयास मिळतात. दिवाळी आता संपलेली आहे. सानपाडा नोडमधील रहीवाशांना दिलासा देण्यासाठी प्रभाग ३० मध्ये व्यापक प्रमाणावर धुरीकरण अभियान राबविणे आवश्यक आहे. केवळ रस्त्यावरून धुरीकरण न करता प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीच्या अंर्तगत भागात तसेच पालिका उद्यानामध्ये धुरीकरण करण्यात यावे. गटारांमध्ये जंतुनाशके टाकण्यात यावी. प्रभागातील डासांच्या समस्येचे निर्मूलन करण्यात यावे. समस्येचे गांभीर्य, साथीच्या आजाराचे अस्तित्व आणि रहीवाशांना होणारा त्रास पाहता संबंधितांना प्रभाग ३० मधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात व उद्यानामध्ये व्यापक प्रमाणावर समस्येचे निर्मूलन होईपर्यत धुरीकरण अभियान राबविण्याचे निर्देश देण्याची मागणी समाजसेवक पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.