विठ्ठल ममताबादे
उरण : उरणमध्ये प्रवाशाच्या दृष्टीने अनेक रस्ते, महामार्ग झाले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात रस्त्याचे रुंदीकरण झाले आहेत. त्यामुळे अनेक वाहने सुसाट वेगाने धावू लागले आहेत. पोलीस प्रशासनाच्या नवी मुंबई वाहतूक विभागाने ठरवून दिलेल्या वेगापेक्षाही ही वाहने आपली मर्यादा सोडून अति वेगाने वाहने चालवीत असल्याने सध्या या वाहन चालकांवर ऑनलाईन दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
जेएनपीटी बंदरातून जेएनपीटी ते पळस्पे व जेएनपीटी ते नवी मुंबई या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आल्याने जेएनपीटी ते पळस्पे व जेएनपीटी जासई गव्हाण मार्गे नवी मुंबई या मार्गावर प्रवास वेगवान झाल्याने प्रवाशी, नोकरदार, कर्मचारी वर्गांना कामावर वेळेत जाणे शक्य झाले आहे मात्र वेगावर नियंत्रण नसल्याने येथे या मार्गांवर अनेक अपघात होत असून अनेकांचा अपघातामुळे बळी जात आहे. यापूर्वी या मार्गावर अनेक अपघात झालेले आहेत. अनेकांचा बळी गेलेला आहे. त्यामुळे या महत्वाच्या मार्गावर वाहणांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचे काम पोलीस प्रशासनाच्या वाहतूक विभागाकडून करण्यात येत आहे. उरण मधील काही नागरिकांनी वेगाने वाहन चालवील्याने व ठरविलेली मर्यादा ओलांडल्याने उरणमधील नागरिकांवर २००० रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसा मेसेज त्या व्यक्तीला मोबाईलवर आला आहे. या दंडात्मक कारवाईमुळे अनेक वाहन चालक आपापली वाहने आता मर्यादित वेगाने चालवत आहेत. जेएनपीटी ते पळस्पे व जेएनपीटी ते नवी मुंबई मार्गावर अनेक अपघात होत असल्याने वेगावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे. शिवाय वाहन चालकांच्या वेगावरही मर्यादा येणार आहे. या यंत्रणेमुळे आता वाहन चालकाकडून सावधानता बाळगली जाऊ लागली आहे.