अबोली पाटील
नवी मुंबई : : सानपाडा सेक्टर सातमधील महापालिका उद्यानांतील तुटलेल्या झोपाळ्यांची डागडूजी तात्काळ करण्याची मागणी भाजपचे सानपाडा नोडमधील युवा नेते व अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी एका लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
सानपाडा हा नोड पूर्णपणे अल्प, अत्यल्प व मध्य उत्पन्न गटातील रहीवाशांचे निवासी वास्तव्य असलेला परिसर आहे. हा नोड किमान ८० टक्के सिडको वसाहतींचा आहे. सानपाडा सेक्टर सातमध्ये नवी मुंबई महापालिकेची संत शिरोमणी महाराज उद्यान आणि कै. सिताराम महाराज उद्यान आहे. या दोन्ही उद्यानात सकाळी व सांयकाळी मोठ्या संख्येने स्थानिक रहीवाशी आपल्या मुलांसह येत असतात. गेल्या काही महिन्यापासून या दोन्ही उद्यानातील झोपाळे पूर्णपणे तुटलेले असून लहान मुलांना या झोपाळ्यांचा खेळण्यासाठी वापर करत येत आहे. झोपाळ्याअभावी लहान मुलांची गैरसोय होत आहे. आता केवळ त्या ठिकाणी झोपाळ्याचे सांगाडेच उरले आहेत. त्यामुळे सानपाडा नोडमधील मुलांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधितांना लवकरात लवकर झोपाळ्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.